सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या खेळीचं कौतुक केलंय. रिषभ पंत हा जागतिक क्रिकेटमधला अॅडम गिलख्रिस्ट असल्याचं पाँटिंगने म्हटलंय. रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत पहिल्या डावात 159 धावांची नाबाद खेळी केल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
आयपीएलमध्ये रिषभ पंत आणि पाँटिंग यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून एकत्र ड्रेसिंग रुम शेअर केलेली आहे. त्यामुळे दोघांचा परिचय तसा नवा नाही. रिषभ कौतुकास पात्र असून चेंडूवर तो तुटून पडतो. खेळाची त्याला खरोखर चांगली समज आहे. मी खरंच नशिबवान आहे, की दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आहे, असं पाँटिंगने म्हटलंय.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना पाँटिंगने हे मत व्यक्त केलं. रिषभला आता विकेटकीपिंगवर जरा काम करण्याची गरज असून तो एक चांगला फलंदाज म्हणून पुढे येणार आहे. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याच्याच विषयी बोलत होतो. तो क्रिकेट विश्वातला दुसरा अॅडम गिलख्रिस्ट आहे, असं पाँटिंग म्हणाला.
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या तुलनेत जास्त शतक ठोकण्याची क्षमता रिषभमध्ये असल्याचंही पाँटिंग म्हणाला. आपण नेहमीच धोनी आणि भारतीय क्रिकेटमधील त्याच्या प्रभावावर बोलतो. धोनीने भारताकडून अनेक कसोटी सामने खेळले, पण फक्त सहा शतक केले. हा युवा खेळाडू जास्त शतक करु शकतो, अशी भविष्यवाणीही पाँटिंगने केली.
सिडनी कसोटीत भारताची बाजू मजबूत
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे लवकर थांबवण्यात आला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 अशी मजल मारली आहे. भारताकडे अद्याप 386 धावांची आघाडी आहे. आजचा जवळपास 17 षटकांचा खेळ वाया गेला. त्यामुळे अर्थातच त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. अन्यथा या 17 षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आजच गुंडाळून त्यांच्यावर फॉलोऑन लादला असता.
कमीन्स आणि हॅण्ड्सॉम्ब खेळत असताना, 83 व्या षटकात तिसऱया चेंडूवर रवींद्र जाडेजाने हॅण्डस्कॉम्बला पायचितची अपील केली. अंपायरने त्याला बाद दिलं नाही. त्यानंतर कोहलीने रिव्ह्यू घेतला, पण पंचाच्या बाजूने निर्णय देण्यात आला आणि भारताचा रिव्ह्यू वाया गेला. यानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.