मुंबई: मेलबर्न कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून जल्लोष साजरा केल्यानंतर, काही तासातच इकडे टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला आणखी एक खुशखबर मिळाली. रोहितची पत्नी रितिका सजदेहने रविवारी रात्री गोंडस बाळाला जन्म दिला. रोहित शर्मा एका मुलीचा बाप बनला. ही बातमी कळताच रोहित शर्मा तातडीने ऑस्ट्रेलियावरुन मुंबईकडे रवाना झाला.
रोहित आणि रितिकाचं हे पहिलंच बाळ आहे. त्यामुळे पत्नीच्या पहिल्या बाळंतपणाच्या काळात तिला सात देण्यासाठी रोहित शर्मा घरी परतला आहे. त्यामुळे 3 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. रोहित शर्माच्या जागी ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, रितिकाने बाळाला जन्म दिल्याची गोड बातमी तिची चुलत बहिण सीमा खानने सोशल मीडियावरुन दिली. ‘बेबी गर्ल, मासी अगेन’ अशी पोस्ट सीमाने केली.
रोहित शर्मा आणि रितिका सचदेह यांचं लग्न 13 डिसेंबर 2015 रोजी झालं होतं. रितिका ही रोहित शर्माची स्पोर्ट्स मॅनेजर होती. तिच्यासोबतच रोहितने लगीनगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षानंतर रोहित आणि रितिका आई-बाबा झाले आहेत.