लंडन : ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर न्यूझीलंडने सुरुवातीलाच भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलंय. सुरुवातीच्या 5 धावांमध्ये महत्त्वाचे फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी 1-1-1 धावा करुन बाद झाले. यासोबतच विश्वचषकात भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंद झालाय. विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.
रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनाही यात अपयश आलं. हार्दिक पंड्या बाद होताच सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी आलं. कारण, भारताचा आणखी एक महत्त्वाचा शिलेदार माघारी परतला होता. या विश्वचषकात रोहित शर्माच्या नावावर 5 शतकं आहेत. संपूर्ण मालिकेत सर्वोत्कृष्ट योगदान दिल्यानंतर ही परिस्थिती पाहून रोहित शर्माच्या वेदनांचा बांध फुटला.
रोहित शर्मा या विश्वचषकात भारतीय फलंदाजीचा सर्वात प्रमुख भाग राहिलाय. शिखर धवन दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर त्याची जागाही रोहित शर्माने भरुन काढण्याचा प्रयत्न केला. विश्वचषकातील 9 सामन्यात रोहित शर्माने 98.78 च्या स्ट्राईक रेटने 647 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा सध्या अव्वल स्थानावर आहे.
भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषकात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत सेमीफायनलपर्यंत मजल मारली. गुणतालिकेतही भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. यापूर्वीच्या 8 सामन्यांमध्ये भारताला फक्त एका सामन्यात म्हणजे इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या डावाची सुरुवातही डळमळीत झाली होती. पण नंतर रॉस टेलरने डाव सावरत मोठी मजल मारुन दिली.
संबंधित बातम्या :
शमीचा अनोळखी मुलीला मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल