अॅडलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची दाणादाण उडाली. मात्र, चेतेश्वर पुजाराने शतकी खेळीसह डाव सावरला आणि भारताची लाजही राखली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण सुरुवातीपासूनच एक-एक करत खेळाडू तंबूत परतू लागले. अखेर चेतेश्वर पुजाराने सर्वोत्तम कामगिरी करत, भारताची धावसंख्या सुस्थितीत आणली. पहिल्या दिवशी 9 खेळाडूंच्या बदल्यात भारताने 250 धावा बनवल्या.
अनेक दिवसांनी कसोटी संघात पुनरागमन झालेल्या रोहित शर्मालाही फार काळ खेळपट्टीवर राहता आलं नाही. केवळ 37 धावा करुन तो बाद झाला. रोहितच्या या 37 धावाही महत्त्वपूर्ण होत्या. कारण, चेतेश्वर पुजारानंतर (123) सर्वाधिक धावसंख्या उभारलेला तो एकमेव फलंदाज होता. या 37 धावांसह रोहितने एक विक्रमही नावावर केला.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एका स्थानाने झेप घेतली. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला मागे टाकलं. वन डे, कसोटी आणि टी-20 सामन्यात मिळून रोहितच्या नावावर एकूण 11170 धावा होत्या, ज्या आज 11206 झाल्या.
शाहीद आफ्रिदीच्या नावावर वन डे, कसोटी आणि टी-20 मध्ये 11196 धावा आहेत. आफ्रिदीने कसोटीत 1716, वन डेत 8064 आणि टी-20 मध्ये 1416 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर (34357) अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (28016), तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (27483) आणि चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने (25957) याच्या नावाचा समावेश आहे.