मँचेस्टर: भारताचा सलामीवीर रोहित शर्मा या विश्वचषकात चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 मध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने एकाच विश्वचषकात 5 शतकं करण्याचाही विक्रम केला आहे. आता तो एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून अवघ्या काही धावा दूर आहे. आगामी सामन्यात तोही विक्रम रोहितच्या नावावर होईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील रोहित अजून 2 शतकं करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
रोहितने विश्वचषकात केवळ 8 सामन्यांमध्ये 647 धावा करत आपल्या दमदार खेळीचे प्रदर्शन केले. रोहितच्या प्रदर्शनावर कोहली म्हणाला, “मी जरी शतक करण्यापासून चुकलो असलो, तरी रोहितच्या कामगिरीने उत्साहित आहे.” कोहलीने या विश्वचषकात 5 अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र, त्याला शतक करण्यात अजून यश आलेले नाही. कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 41 शतकं ठोकली आहेत. या विश्वचषकात शतक ठोकण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कोहली म्हणाला, “मला शतकं कसं ठोकायचं याची पूर्ण कल्पना आहे. मात्र, सध्या मी मधल्या फळीत खेळण्याची जबाबदारी पार पाडत आहे. मी हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत या खेळाडूंना खेळण्याची संधी देत आहे. शेवटी मी माझ्या धावांची गती वाढवू शकतो हे मला माहिती आहे.”
न्युझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल अगोदर विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, “रोहितने म्हटल्याप्रमाणे संघात कुणीही व्यक्तीगत विक्रम करण्यावर भर देत नाही. आम्ही संघाच्या विजयासाठी सामुहिक प्रयत्न करत आहोत. या प्रवासातच काही खास विक्रम घडत आहेत. रोहित आणखी 2 शतकं ठोकेल, म्हणजे भारताला आणखी 2 विजय मिळतील, अशी आशा आहे. रोहित जगातील सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय फलंदाज आहे.”
रोहितने आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमात त्याने सचिन तेंडुलकरशी तुलना केली आहे. लवकरच तो हा विक्रमही मोडीत काढेल असं दिसतं आहे.