मुंबई : भारतीय संघ आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी जुंपलेला असतानाच कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील मतमतांतर समोर आलं आहे. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच आयपीएल संपणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाजांना आराम दिला जावा असं विराटचं मत आहे. तर हे चूक असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमधून वेगवान गोलंदाजांना आराम द्यावा, अशी कोहलीची इच्छा आहे. हैदराबादमध्ये क्रिकेट प्रशासक समिती (सीओए) च्या बैठकीत ठेवलेल्या या प्रस्तावाला फ्रँचायझी संघांचाही विरोध असेल, असं बोललं जात आहे. शिवाय रोहित शर्मालाही हा सल्ला आवडलेला नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या मते, बैठकीत सीओए प्रमुख विनोद राय यांनी रोहित शर्माला त्याचं मत विचारलं. रोहितने स्पष्ट केलं, की मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला आणि जसप्रीत बुमरा फिट असेल तर त्याला आराम दिला जाणार नाही.
दरम्यान, बैठकीतील दुसऱ्या एका अधिकाऱ्यानेही विराटच्या या सल्ल्यावर आश्चर्य व्यक्त केलं. भारतीय वेगवान गोलंदाजांना संपूर्ण आयपीएलमधून विश्रांती देणं हे अजब आहे. गेल्या काही वर्षांपासून आयपीएल ट्रेनर आणि फिजिओ खेळाडूंच्या व्यस्ततेमुळे भारतीय स्टाफसोबत मिळून काम करत आहेत. पुढच्या वर्षीही हेच होईल आणि गोलंदाजांना सर्व सामने खेळवले जाणार नाहीत, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
विराटची विशेषतः भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना आराम देण्याची इच्छा आहे. कारण, आयपीएल संपल्यानंतर लगेचच विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी भारताचे प्रमुख गोलंदाज नव्या दमाने मैदानात उतरावेत, असं विराटचं मत आहे.