मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारताने पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या 170 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आला. पण भारतीय चाहते कर्णधार विराट कोहलीवर नाराज झाले आहेत. रोहित शर्माचं शतक विराटमुळे चुकल्याचा आरोप चाहते करत आहेत.
443 धावसंख्येवर रवींद्र जाडेजा बाद झाला आणि विराटने डाव घोषित केला. त्यावेळी रोहित शर्मा 63 धावांवर खेळत होता. रोहितची लय पाहता ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तो आपलं पहिलं शतक नक्की ठोकणार असं वाटत होतं. पण विराट कोहलीच्या निर्णयाने रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज झाले. काही चाहत्यांनी विराट कोहलीच्या निर्णयाची तुलना राहुल द्रविडच्या त्या निर्णयाशी केली, जेव्हा सचिन तेंडुलकर 194 धावांवर असताना पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेल्या मुल्तान कसोटीत द्रविडने डाव घोषित केला होता.
भारताने सात बाद 443 धावांवर असताना डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला खेळण्याची संधी दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता आठ धावा केल्या होत्या. विराट आणि पुजाराने 215 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांनी भारताला 300 धावसंख्येच्या जवळ नेलं.
मिचेल स्टार्कने 293 धावांवर असताना कोहलीला 82 धावांवर बाद केलं. पुजाराही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला पॅट कमिन्सने बाद केलं. चेतेश्वर पुजाराने 319 चेंडूंचा सामना करत 10 चौकारांच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. यानंतर अजिंक्य रहाणे (34) आणि रोहित शर्मा (नाबाद 63) यांनी भारताचा डाव सावरला.
रहाणे बाद झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या अडचणी कमी झाल्या नाही. रोहित शर्माने रहाणे बाद झाल्यानंतर युवा फलंदाज रिषभ पंतसोबत सहाव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. रिषभनंतर जाडेजा आला. जाडेजा लवकरच बाद झाला आणि त्यानंतर भारताने डाव घोषित केला.