लंडन : विश्वचषकात इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव केला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला पेललं नाही. भारताला इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 306 धावात रोखलं. भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं, मात्र त्याच्या शतकाला विजयाचा टिळा लागला नाही. या सामन्यात भारताच्या फलंदाजीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. धोनी आणि केदार जाधवने संथ फलंदाजी केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केदार जाधवच्या फलंदाजीवरुन काही बदल सूचवले आहेत.
सचिनने ‘इंडिया टुडे’शी बोलताना केदार जाधवऐवजी रवींद्र जाडेजाला संधी देण्याचा विचार संघ प्रशासनाने करावा, असं म्हटलं. इंग्लंडचे जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या उजव्या हाताच्या फलंदाजांनी तब्बल 160 धावांची सलामी दिली. अशा परिस्थितीती डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जाडेजाने नक्कीच मोलाची भूमिका बजावली असती असं सचिन म्हणाला.
जर केदार जाधव सातव्या नंबरवरच उतरणार असेल तर रवींद्र जाडेजाही त्या नंबरवर फलंदाजी करु शकतो. शिवाय जाडेजा गोलंदाजीत महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे जाडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही कामगिरी उत्तम करु शकेल, असं सचिनचं म्हणणं आहे.
भारताचा पराभव
विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत, विश्वचषकातील आव्हान कायम ठेवलं आहे. भारताचा यंदाच्या विश्वचषकातील पहिला पराभव आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला पेललं नाही. भारताला इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 306 धावात रोखलं.
केदार जाधवची संथ फलंदाजी
या सामन्यात हार्दिक पंड्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनी आणि केदार जाधवच्या फलंदाजीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दोघांना मोठे फटकेच मारता आले नाहीत. त्यामुळे भारताचे धावांचं आणि चेंडूमधील अंतर वाढत गेलं.
45 व्या षटकात धोनीच्या साथीला केदार जाधव आला. त्यावेळी भारताला 31 चेंडूत 71 धावांची गरज होती. मात्र या दोघांना मोठे फटके मारता न आल्याने धावांचं अंतर वाढलं. हे दोघे जिंकण्यासाठी खेळतच नाहीत असंच दिसत होतं.
धोनीने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 42 धावा केल्या. तर केदार जाधवने 13 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या.
संबंधित बातम्या
जिंकण्यासाठी खेळले की नाही? धोनी-केदारच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह
ऋषभ पंत कुठाय, ऋषभ पंत कुठाय विचारत होता ना, घ्या आता! रोहितकडून खिल्ली