सांगली : जो जीता वहीं सिकंदर ‘ डोळ्याचं पातं लवतं ना लवत तोच सिकंदर शेखनं (Sikandar Shaikh) सांगलीच्या कुस्ती मैदानात (wrestling ground)पैलवान गोपी पंजाबला अस्मान दाखवलं. कालचं मैदान सांगलीत (Sangli) झालं, त्यानंतर कृष्णाकाठावर कुस्ती शौकिनांनी सिकंदरला उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला बाजीगर पैलवान सिकंदर शेख सांगलीचा मैदान मारणार का ? याचं उत्तर अवघ्या एका मिनिटात सिकंदरनं दिलं . त्याच्याशी लढायला पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या गोपी पंजाबला एकचाक डावावर हरवत सिकंदरनं कुस्ती शौकिनांची शाबासकी मिळवली . त्यानंतर सिकंदर शेखला अनेकांनी बक्षीस दिलं.
सांगलीत काल कुस्तीचं मैदान बघायला मोठी गर्दी झाली होती. आयर्विन पुलावजळचा सरकारी घाट गर्दीनं गच्च भरुन गेला होता . ट्रबल शुटींग सोशल वेलफेअर फाऊंडेशन व कुस्ती प्रेमीग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत कृष्णा काटावर कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवार कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. दुपारी तीनच्या सुमारास कुस्तीचं मैदान सुरु झालं होतं. परंतु सायंकाळी उशिरा मानाच्या कुस्त्या सुरु झाल्या . प्रथम क्रमांकाची कुस्ती गंगावेस तालीम कोल्हापूरचा पै . सिंकदर शेख विरुध्द पंजाबचा पै . गुरुप्रित सिंग उर्फ गोपी पंजाब यांच्यात होणार असल्यामुळे मैदानात मोठी गर्दी झाली होती. कुस्ती सुरु झाली अन् कोण जिंकणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
अडीच लाख रुपये रोख आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक कोण जिंकणार याची उत्सुकता असलेल्या कुस्ती शौकिनांनी असल्यामुळे कुस्तीसाठी तुफान गर्दी झाली होती. रात्री साडे दहाला ही कुस्ती सुरू झाली आणि काही सेकंदाची खडाजंगी होते न होते तोवर अवघ्या मिनिटात सिकंदरने कुस्ती जिंकून सुध्दा दाखवली. त्या कुस्तीसाठी हणमंत जाधव यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली . द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान भारत मदने आणि बाला रफिक यांच्यात झाली.