मुंबई : सानिया मिर्झा (Sania Mirza) शोएब मलिक (Shoaib Malik)यांचा घटस्फोट होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) दोघांचे अनेक मीम्स व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या मीडियाने जाहीरपणे दोघं अनेक दिवसांपासून विभक्त राहत असल्याचं सांगितलं होतं. जगभर सानिया मिर्झा शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. मात्र दोघांनी या गोष्टीवर कुठेही भाष्य केलं नव्हतं.
पाकिस्तानचा ओटीटी प्लॅटफॉर्म उर्दूफ्लिक्सवर सानिया मिर्झा शोएब मलिक यांचा एक नवा शो येणार आहे. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा शो येणार असल्याचं जाहीर केलं आहे. तेव्हापासून दोघांची अनोखी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. ‘द मिर्जा मलिक शो’असं सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या शोचं नाव आहे. दोघांनी मुद्दाम चर्चेत येण्यासाठी पब्लिसिटी स्टंट केला होता अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
दोघं वेगळे होणार असल्याची पहिली माहिती पाकिस्तान मीडियाने दिली होती. पाकिस्तानच्या जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार दोघंही विभक्त व्हायला तयार आहेत. तसेच ते लवकरचं तशी घोषणा करतील असं वृत्त देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सानिया आणि शोएब दोघेही वेगळे होण्यास तयार असल्याचे त्यांनी एका खास मित्राला सांगितले होते अशीही बातमी जियो न्यूजने दिली होती.