मुंबई : क्रिकेटच्या मैदानात आपल्या वेगवान माऱ्याने धडकी भरवणारे गोलंदाज आपण पाहिले आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि ब्रेट ली (Brett Lee) यांचा मारा फलंदाजांना अक्षरश: धडकी भरवणाराच होता. या दोघांनी क्रिकेटचा एक काळ गाजवला. त्यांना टक्कर देणाऱ्या वेगवान गोलंदाज सहसा पाहायला मिळत नव्हते. मात्र त्याच दरम्यान, एका गोलंदाजाने सर्वांचं लक्ष आपल्या स्पीडने वेधून घेतलं होतं. त्याचं नाव होतं शॉन टेट (Shaun Tait). आज शॉन टेटचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याच्या कारकिर्दीचा हा आढावा.
शॉन टेट हा ऑस्ट्रेलियातील अॅडिलेडमध्ये 22 फेब्रुवारी 1983 रोजी जन्मला. लहान वयातच टेटने क्रिकेटचे धडे गिरवले. 13-14 वर्षाच्या वयात शॉन टेटच्या बोलिंगचं स्पीड हे आंतरराष्ट्रीय गोलंदाजाइतकं होतं. त्याच्या या वेगवान माऱ्यामुळेच त्याला लगेचच ऑस्ट्रेलियाच्या संघात (Australian Cricket Team) स्थान मिळालं.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी इंग्लंडविरुद्ध होणारी अॅशेस कसोटी (Ashesh Test) मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूचं या सीरिजमध्ये खेळण्याचं स्वप्न असतं. काहीच खेळाडूंचं हे स्वप्न पूर्ण होतं. शिवाय या अत्यंत महत्त्वाच्या मालिकेत चक्क पदार्पणाची संधी मिळालेलेही मोजकेच खेळाडू आहेत. त्यामध्ये शॉन टेटचा समावेश आहे. टेटने 2005 मध्ये ऐतिहासिक अॅशेस टेस्ट (Ashesh Test)मधून कसोटी पदार्पण केलं होतं. झंझावाती गोलंदाजी करत शॉन टेटने पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात त्याला विकेट घेण्यात अपयश आलं.
मग टेटला दुसऱ्या कसोटीतही स्थान मिळालं. तिथेही त्याला दोन विकेट घेता आल्या. मात्र केवळ वेग वगळता अन्य कोणतीही मोठी कामगिरी त्याला करता आली नाही. त्यामुळे पुढे दीड वर्ष टेट संघाबाहेर राहिला.
कसोटीत 2005 मध्ये पदार्पण केलेला शॉन टेटला वनडे पदार्पणाची संधी 2007 मध्ये मिळाली. फेब्रुवारी 2007 मध्ये वन डेमध्ये पदार्पण केलेल्या टेटला त्याच्या स्पीडचा जसा फायदा झाला, तसा त्याला फटकाही बसला. दुखापतीमुळे तो सातत्याने संघाबाहेर राहिला. 2007 मधील विश्वचषकात टेट यशस्वी ठरला. त्याने 11 सामन्यात 23 विकेट घेत, अव्वल गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला. त्याच्यापेक्षा जास्त विकेट केवळ ग्लेन मॅकग्राला (26 विकेट) मिळाल्या होत्या.
टेटने 2008 मध्ये अचानक ब्रेक घेतला. मग 2009 मध्ये त्याने कसोटीला रामराम ठोकला. मात्र 2009 मध्ये निर्धारित षटकांच्या सामन्यातून त्याने पुनरागमन केलं. 2010 मध्ये लॉर्डच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्याने तब्बल 161.1 किलोमीटर प्रतितास वेगाने बोलिंग केली. क्रिकेटच्या इतिहासातील ती संयुक्तपणे वेगवान गोलंदाजी होती. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्याच ब्रेट लीनेही याच वेगाने गोलंदाजी केली होती. शोएब अख्तरचा रेकॉर्ड मोडेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही.
यानंतर शॉन टेटचं आंतरराष्ट्रीय करिअर जास्तवेळ टिकलं नाही. 2011 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी कामगिरी करु शकला नाही. क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात युवराज सिंहने अर्धशतक ठोकलं होतं. युवराजने शॉन टेटला धू धू धुतलं होतं. त्यामुळे टेटचं करिअरच संपलं.
शॉन टेटने आपल्या वेगवान माऱ्यासह खेळाडूंवर स्लेजिंगचेही हल्ले केले. टेटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर टिपण्या केल्या. मात्र एका मुलाखतीदरम्यान त्याने चूक मान्य करत, आपण सचिनवर स्लेजिंग करणं गैर होतं, असं कबूल केलं होतं.
शॉन टेट केवळ 3 कसोटी खेळला. यामध्ये त्याने 5 विकेट्स घेतल्या. कसोटीपेक्षा त्याने वनडे कारकीर्द गाजवली. केवळ 35 सामने खेळलेल्या टेटने वन डेमध्ये 62 विकेट्स घेतल्या. टेटने 2017 मध्ये टी 20 मधून निवृत्ती घेतली. टी ट्वेण्टीमध्ये 21 सामन्यात त्याने 28 विकेट्स घेतल्या.
संबंधित बातम्या
खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून हकालपट्टी, आता झंझावाती शतक ठोकून दिल्लीला हरवलं