मुंबई : क्रिकेट आणि स्लेजिंग हे काय नवीन राहीलं नाही. प्रतिस्पर्धी फलंदाज आपल्या संघावर हावी होत असेल तर त्याचं लक्ष विचलीत करण्यासाठी माईंड गेम खेळला जातो. त्यामुळे अनेकदा फलंदाजाला तंबूत परतावं लागतं. असंच काहीसा किस्सा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि शोएब मलिक यांच्यात भर मैदानात घडला होता. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की काहीच सांगायला नको. मैदानात खेळाडू एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही.असाच मैदानात घडलेला किस्सा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान मलिकने एका युट्यूब चॅनेलवर सांगितला. कसोटी मालिकेतील एका सामन्यात कर्णधार सौरव गांगुली शोएब मलिकवर भडकला होता. हा सामना 2005 मध्ये मोहाली स्टेडियममध्ये रंगला होता. तेव्हा सौरव गांगुली स्ट्राईकवर असताना शोएब मलिकने त्याला डिवचलं होतं. त्याचं झालं असं की पुढच्या चेंडूवर गांगुलीला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
कामरान मलिकने युट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं की, “2005 मध्ये मोहाली कसोटी सामन्यात दानिश कनेरिया गोलंदाजी करत होता. तेव्हा शोएब मलिक सिली मिड ऑन आणि सलमान बट्ट सिली मिड ऑफला फिल्डिंग करत होते. दानिश कनेरियाकडून लेंथ चुकली आणि त्याचा फायदा गांगुलीने घेतला. त्या चेंडूवर सौरवने चौकार मारला. तेव्हा शोएब मलिक म्हणाला, बघितलंस कामरान किती प्रेशर आहे दादावर, षटकार मारणाऱ्या चेंडूवर चौकार मारला.त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी दादा पुढे गेला आणि स्टंपिंग झाला. तेव्हा मैदान सोडताना दादा चांगलाच भडकला होता. जाताना मलिकला म्हणाला, तू स्वत:ला खूप हुशार समजतोस का, मी तुला सोडणार नाही, तू बाहेर भेट.”
हा संपूर्ण प्रकार मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात घडला होता. पण गांगुली त्या डावात स्टंपिंग झाला नव्हता. दिनेश कानेरियाच्या गोलंदाजीवर तो झेल बाद झाला होता. गांगुलीने 74 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 312 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 496 धावांवर 9 गडी गमवत डाव घोषित केला होता. त्यानंतर पाकिस्तानने 516 धावा केल्या. तर भारताने दुसऱ्या डावात 1 गडी गमवून 85 धावा केल्या. हा सामना अनिर्णित ठरला. या सामन्यात विरेंद्र सेहवागने 173 धावांची खेळी केली होती. तर सचिन तेंडुलकरच शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं होतं.