द. आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाची निवृत्ती, ‘त्या’ विक्रमापासून अवघ्या काही धावांवर असताना संन्यास

| Updated on: Aug 09, 2019 | 9:21 AM

दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज हाशिम अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजारांचा टप्पा गाठण्यापासून 718 धावा दूर असताना त्याने हा निर्णय घेतला

द. आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाची निवृत्ती, त्या विक्रमापासून अवघ्या काही धावांवर असताना संन्यास
Follow us on

केप टाऊन : दक्षिण आफ्रिका (South Africa) क्रिकेट संघाचा  धडाकेबाज फलंदाज हाशिम अमला (Hashim Amla) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ‘विक्रमवीर’ अमलाने आपला निर्णय जाहीर केला. गेली 15 वर्ष त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलं. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजारांचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी बजावण्यासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना अमलाने घेतलेला निर्णय धक्कादायक मानला जात आहे.

गेल्या काही महिन्यांत 36 वर्षीय हाशिम अमलाची बॅट फारशी तळपताना दिसलेली नाही. नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही अमला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. वर्ल्ड कपमध्ये त्याने तीन अर्धशतकं केली होती. श्रीलंकेविरुद्ध केलेली 80 धावांची खेळी ही त्याची वनडेमधील अखेरची ठरली. विश्वचषकानंतर त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

अमलाने 124 कसोटी, 181 एकदिवसीय आणि 44 टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 311 धावा ठोकल्या होत्या. त्रिशतक झळकवणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच फलंदाज ठरला होता.

वनडे सामन्यात 25 शतकं ठोकणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन फलंदाज ठरला आहे. वनडे आणि कसोटी सामन्यात प्रत्येकी 25 शतकं ठोकणारा तो जगातला चौथा, तर दक्षिण आफ्रिकेचा एकमेव फलंदाज आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावे जमा आहे. त्यानंतर सात हजारापर्यंत प्रत्येक हजार धावांचा टप्पा त्याने सर्वाधिक वेगाने गाठला.

वनडे मध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावा करणारा फलंदाज (40 सामने)
वनडे मध्ये सर्वात वेगवान तीन हजार धावा करणारा फलंदाज (59 सामने)
वनडे मध्ये सर्वात वेगवान चार हजार धावा करणारा फलंदाज (81 सामने)
वनडे मध्ये सर्वात वेगवान पाच हजार धावा करणारा फलंदाज (101 सामने)
वनडे मध्ये सर्वात वेगवान सहा हजार धावा करणारा फलंदाज (123 सामने)
वनडे मध्ये सर्वात वेगवान सात हजार धावा करणारा फलंदाज (150 सामने)

एकाच वर्षी (2010) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी एक हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रमही त्याने केला आहे.

हाशिम अमलाने 124 कसोटी सामन्यांमध्ये 9 हजार 282 धावा केल्या आहेत. दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून तो केवळ 718 धावा दूर होता. मात्र गेल्या वर्षभरात केवळ एकच शतक करु शकल्यामुळे संघावर भार न होण्याचा निर्णय त्याने घेतला. युवा क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी संघातून वेळीच बाहेर पडण्याचा निर्णय त्याने घेतला.

अमलाने जर कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजारांचा टप्पा ओलांडला असता, तर जॅक कॅलिस (13 हजार 289) नंतर ही कामगिरी बजावणारा तो दुसराच दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला असता. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजारांचा टप्पा ओलांडणारे जगात केवळ 13 फलंदाज आहेत.

एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन यांच्यापाठोपाठ अमलानेही निवृत्ती घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणार आहे.