लंडन : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंह धोनीच्या ग्लोव्जवर असलेल्या ‘बलिदान बॅज’मुळे नवा वाद समोर आलाय. आयसीसीने हा बॅज काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण हा बॅज घालूनच मैदानात उतरणार असल्याचं धोनीने स्पष्ट केलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हा बॅज धोनीच्या ग्लोव्जवर दिसून आला होता. त्यानंतर आयसीसीने बीसीसीआयला हा बॅज हटवण्याचं आवाहन केलं होतं.
दुसरीकडे हा बॅज इंडियन आर्मीचा नसल्याचं स्पष्टीकरण सैन्याने दिलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, हा बॅज स्पेशल फोर्सेसचं प्रतीक चिन्हं असून नाव कायम हिंदीत लिहिलेलं असतं. हा चिन्ह कायम छातीवर लावलं जातं. धोनीच्या ग्लोव्जवर असलेला बॅज पॅरा स्पेशल फोर्सेसचं प्रतीक चिन्ह आहे.
बीसीसीआयकडून समर्थन, सोशल मीडियावरही मोहिम
आयसीसीने धोनीच्या ग्लोव्जवरील बॅज काढून टाकण्याचं आवाहन केल्यानंतर बीसीसीआयनेही धोनीची पाठराखण केली होती. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले की, “आम्ही आयसीसीली बलिदान बॅज लावण्याची परवानगी घेण्यासाठी अगोदरच आयसीसीला पत्र लिहिलंय.”
बीसीसीआयनंतर क्रीडा मंत्रालयानेही धोनीचं समर्थन केलं होतं. क्रीडा मंत्री किरण रिजीजू म्हणाले, खेळाच्या प्रकरणात सरकार हस्तक्षेप करत नाही, या संस्था स्वायत्त आहेत. पण मुद्दा देशाच्या भावनांशी संबंधित असेल तर राष्ट्रहित लक्षात घेतलं जातं. मी बीसीसीआयला आयसीसीकडे हे प्रकरण लावून धरावं अशी विनंती करतो, असं ते म्हणाले.
आयसीसीच्या सूत्रांनुसार, बीसीसीआय आणि धोनी यांनी हे स्पष्ट केलं, की बॅजचा कोणत्याही धर्माचा संबंध नाही, तर त्याला परवानगी मिळू शकते.
सोशल मीडियावर मात्र महेंद्रसिंह धोनीचे चाहते आणि इतरही नामवंत व्यक्तींनी #DhoniKeepTheGlove या हॅशटॅग मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. सिनेमा, क्रीडा क्षेत्रांसह अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी ट्वीट करुन, धोनीला पाठिंबा दिला आहे. महेंद्रसिंह धोनीचा मला अभिमान आहे. त्याने ‘बलिदान बॅज’ कायम ठेवायला हवं, असे पैलवान योगेश्वर दत्त म्हणाला. तसेच, माजी हॉकी खेळाडू सरदार सिंह, सुशील कुमार यांच्यासारखे क्रीडापटूही धोनीच्या समर्थनात उतरले आहेत. ‘बलिदान बॅज’ परिधान करणं सन्मानाची बाब आहे, आयसीसीने अशाप्रकारे आक्षेप घ्यायला नको, असे सर्वच खेळाडूंचे म्हणणे आहे.
‘बलिदान बॅज’ काय आहे?
पॅरा मिलिट्रीच्या जवानांकडे ‘बलिदान बॅज’ नावाचं वेगळं बॅज असतं. ‘बलिदान’ असे या बॅजवर देवनागरी लिपीत लिहिलेलं असतं. चांदीपासून बनललेल्या या बॅजच्या वरील बाजूस लाल प्लास्टिकचं आवरण असतं. केवळ पॅरा कमांडोंकडे हे बॅज असतं.
धोनीकडे ‘बलिदान बॅज’ कसं?
धोनीला 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टिनंट कर्नल ही मानद उपाधी मिळाली आहे. शिवाय धोनीने त्याच्या रेजिमेंटसोबत विशेष ट्रेनिंगही घेतली होती. सैन्याविषयीचा आदर धोनीने वेळोवेळी बोलून दाखवलेला आहे. सैन्यात जाण्याची इच्छा त्याने अनेकदा बोलूनही दाखवलेली आहे.