मुंबई : आयसीसीने टीम इंडियाचा ऑलराउंडर रविंद्र जडेजा याच्यावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती. आयसीसीच्या नियमांनुसार, जडेजा याला एकूण मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागली होती. जडेजाने फिल्ड अंपायरना विश्वासात न घेता हातात बॉल ठेवून मलम लावला होता. त्यामुळे जडेजावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आयसीसीने आणखी एका खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली आहे.
श्रीलंकेची यष्टिरक्षक फलंदाज अनुष्का संजीवनीला ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये तिच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या ग्रुप 1 च्या सामन्यात अनुष्काला ICC च्या आचार संहिता लेव्हल 1 मध्ये दोषी आढळली.
संजीवनीला आयसीसीच्या 2.5 या नियमानुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. आयसीसीच्या 2.5 या नियमात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू बाद झाल्यानंतर आक्रमक हावभाव, भाषा आणि कृती यासाठी दोषी आढळणं याची तरतूद आहे. दरम्यान संजीवनीला एकूण मॅच फीच्या 15 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
बांगलादेशच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातील 10 व्या षटकामध्ये हे घडलं. बॅटर शोभना मोस्तरी बाद झाल्यावर संजीवनीने त्यावेळी तिच्याकडे धावत गेली आणि नियमांचं उल्लंघन करणारे हावभाव केले होते. केपटाऊन न्यूलँड्स येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात 8 गडी गमावत 126 धावा केल्या. बांगलादेशकडून मोस्तारीने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर कर्णधार निगार सुलतानने 28 धावा केल्या. बांगलादेशकडून मिळालेल्या 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ उतरला. 18.2 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. श्रीलंकेकडून हर्षिता मडावीने नाबाद 69 धावा केल्या.
दरम्यान, महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना हा 15 फेब्रुवारीला पार पडणाार आहे. या सामन्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात विंडिज विरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.