कोलंबो : श्रीलंकन क्रिकेटपटू कुसल मेंडिस याच्या कारखाली चिरडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ‘हिट अँड रन’ प्रकरणी कुसल मेंडिसला कोलंबो पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (Cricketer Kusal Mendis arrested after fatal accident in Panadura)
कोलंबोपासून 30 किमी दूर असलेल्या पानादुरा शहरात आज सकाळी (रविवार) हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी 25 वर्षीय कुसल कार चालवत असल्याची माहिती आहे.
64 वर्षीय वृद्ध व्यक्ती सायकल चालवत होती. कुसलच्या कारने चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कुसल पसार झाला, मात्र पोलिसांनी त्याला काही तासातच बेड्या ठोकल्या.
कोण आहे कुसल मेंडिस?
कुसल मेंडिस हा श्रीलंका क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. मेंडिसने श्रीलंकेकडून 44 कसोटी सामन्यांमध्ये 2995 धावा केल्या आहेत. तर 76 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 2167 धावा रचल्या आहेत. कुसलने 26 टी20 सामन्यांमध्ये 484 धावाही ठोकल्या आहेत. कोविड लॉकडाऊननंतर मैदानात उतरलेल्या प्रशिक्षण शिबिराचा तो भाग होता.
श्रीलंकेत रस्ते अपघातात दरवर्षी 3 हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. महिला पादचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्या प्रकरणी 2003 मध्ये माजी फिरकीपटू कौशल लोकुआराचीला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
(Cricketer Kusal Mendis arrested after fatal accident in Panadura)