मुंबई : बॉल टेम्परिंगच्या वादात गेली 11 महिने संघातून बाहेर असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात खेळणार आहे. आगामी बांगलदेश दौऱ्यात स्टीव्ह स्मिथला खेळवले जाणार होते. मात्र, दुखापतीच्या कारणामुळे स्मिथला बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे स्मिथचा संघातील पुनरागमन लांबलं आहे. मात्र, पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल आणि त्यानंतर सुरु होणाऱ्या वर्ल्डकपआधीच स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात परतणार आहे.
आगामी वर्ल्डकप आणि आयपीएलमध्ये खेळण्यासाठी स्मिथ तयार होत आहे, असे ऑस्ट्रेलियन संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. स्मिथला झालेल्या दुखापतीतून तो लवकरच ठीक होईल आणि आतापर्यंत त्याच्या दुखापतीमध्ये सुधारणाही होत असल्याचं सांगितलं जात आहे.
स्मिथच्या हाताला लावलेले सपोर्ट काढले जात नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही. मात्र, स्टिव्ह स्मिथचे मॅनेजर वॅरेन क्रेग यांच्या माहितीनुसार, पूर्णपणे ठीक होण्यासाठी साडेतीन आठवडे लागतील.
गेल्या वर्षी बॉल टेम्परिंगच्या वादामुळे स्टिव्ह स्मिथसोबत डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावरही संघात खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. बॅनक्राफ्टवर लावण्यात आलेली बंदी संपली असली, तरी स्मिथ आणि डेव्हिडवर लावण्यात आलेली बंदी येत्या 29 मार्चला संपणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या दोन्ही दिग्गज खेळाडूंना बाहेर ठेवावे लागल्यामुळे संघाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. गेल्या सोमवारी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार टीम पेन यांनी म्हटलं की, आम्हाला आशा आहे की, हे दोघे यावर्षी अॅशेसमध्ये संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतील. शिवाय, त्यांच्यावरील बंदी लवकरच संपेल आणि ते दोघं संघात परततील तसेच संघाला कसोटी सामन्यात विजय मिळवून देतील.