मुंबई: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा वन डे सामना जिंकून, वन डे मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने वन डे मालिका जिंकून चषक तर जिंकला, मात्र ऑस्ट्रेलियाने दाखवलेल्या दळभद्रीपणामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर प्रचंड संतापले. या मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्याबद्दल धोनीला मालिकावीराचा तर तिसऱ्या सामन्यात 6 विकेट घेणाऱ्या यजुवेंद्र चहलला सामनावीराचा किताब देण्यात आला. मात्र दोघांनाही बक्षीस म्हणून केवळ 500-500 डॉलर म्हणजे जवळपास 35-35 हजार रुपये देण्यात आले. भारतीय खेळाडूंनी ही रक्कम दान केली.
भारताने सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅडम ग्रिलख्रिस्टने भारतीय संघाला केवळ विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान केली. मात्र ऑस्ट्रेलियाकडून कोणती आर्थिक रक्कम बक्षीस रुपात दिली नाही.
याबाबत गावसकर म्हणाले, “500 डॉलर ही काही रक्कम आहे का? विजयी संघाला केवळ चषक देणं हे लाजिरवाणं आहे. आयोजक प्रसारण हक्कातून मोठी रक्कम कमावतात, मग खेळाडूंना बक्षीस देण्यास हरकत काय? खेळाडूंमुळेच तर आयोजकांना पैसे मिळतात”. याशिवाय विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये देण्यात येणारी रक्कम पाहा, असा सल्लाही गावसकरांनी दिला.
दरम्यान, भारतात कोणत्याही मालिकेदरम्यान, उत्कृष्ट खेळाडूंचा यथेच्छ सन्मान केला जातो. आयपीएल असो किंवा अन्य कोणतीही क्रिकेट मालिका, खेळाडूंना लाखो रुपये दिले जातात. इतकंच काय प्रो कबड्डीसारख्या खेळातही खेळाडूंना बाईक देऊन गौरवलं जातं. त्या बाईकची किंमतही 60 हजारांच्या पुढे असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चिरकूट रक्कम देऊन एकप्रकारे भारतीय खेळाडूंचा अपमान केल्याची भावना क्रिकेटशौकिनांची आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद 87 धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्स राखून मात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला यजुवेंद्र चहलच्या फिरकीने 48.4 षटकात सर्वबाद 230 धावात रोखलं होतं. ऑस्ट्रेलियाचं 231 धावांचं आव्हान भारताने सहज पार केलं. या सामन्यासह भारताने वन डे मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी ट्वेण्टी मालिका अनिर्णित राहिली, कसोटी आणि वन डे मालिका भारताने 2-1 अशी जिंकली. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर भारताने इतिहास रचला.