मुंबई : सूर्यकुमार यादवनं टी 20 मध्ये आपल्या फलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयसीसी टी 20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे. मात्र असं असूनही वनडे आणि कसोटीत सूर्यकुमारच्या फलंदाजीला ग्रहण लागलं आहे असंच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याला भोपळा फोडता आला नाही. मिचेल स्टार्कनं त्याला दोनदा शून्यावर बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे टी 20 भारी खेळणारा सूर्यकुमार यादव वनडेत सूरच गवसत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता तो टीकाकाराच्या रडारवर आला आहे.
सूर्यकुमार वारंवार अपयशी ठरूनही कर्णधार रोहित शर्मा त्याला संधी देत आहे. रोहित शर्माला त्याच्या फलंदाजी क्षमतेवर विश्वास आहे. भारतीय संघाच्या निवड समितीतील माजी सदस्य साबा करीम यांनी याबाबत आपलं मत स्पष्ट केलं आहे. वारंवार अपयशी होऊनही त्याला संधी देण्यामागचं कारण त्याने स्पष्ट केलं.
“भारतीय संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादव याच्याकडे श्रेयस अय्यरचा पर्याय म्हणून पाहात आहे. मला खात्री आहे की, अय्यर पुनरागमन करेल आणि विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.कारण त्याने या स्थानावर चांगली कामगिरी केली आहे.” असं साबा करिमनं सांगितलं.
“सूर्यकुमार सध्या विचित्र स्थितीत आहे. तो टी 20 मध्ये अव्वल आहे. तो एकदिवसीय सामन्यात धावा कसा करू शकत नाही? यामुळे मला वाटते रोहित शर्मा त्याला आणखी काही संधी देऊ इच्छितो.”, असंही साबा करिमनं पुढे सांगितलं.
सूर्यकुमार यादवनं फेब्रुवारी 2022 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत 16 सामातन्य नाबाद 34 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 32 वर्षीय सूर्यकुमार यादव आतापर्यंत 22 वनडे सामने खेळला आहे. यात त्याचा फलंदाजी सरासरी 25.47 इतकी आहे. सूर्यकुमार यादवने वनडेत एकूण 433 धावा केल्या आहेत.
“चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी तुम्ही संजू सॅमसनचाही विचार करू शकता.”, याकडेही साबा करीमने लक्ष वेधलं. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरनं अलीकडेच ऑस्ट्रेलिया मालिकेत सूर्यकुमार यादव ऐवजी संजू सॅमनला पाठिंबा दिला होता.
“चौथ्या क्रमांकासाठी सरफराज अहमद आणि रजत पाटीदार यांच्याही पर्याय आहे. पण ते दोघंही जखमी आहे. त्यामुळे संजू सॅमसनचा पर्याय योग्य ठरू शकतो. पण तो फिट आहे की नाही हे मला माहिती नाही.”, असंही साबा करीमनं पुढे सांगितलं.