मुंबई : देशात सध्या सर्वात मोठी टी 20 म्हणजेच सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धा (syed mushtaq ali t20 trophy 2021) सुरु आहे. या स्पर्धेला सुरुवात होऊन आठवडा झाला आहे. मात्र या आठवड्याभरात या स्पर्धेतून अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय आणि लक्षवेधी कामगिरी केली. यापैकी असाच एक मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) नावाचा केरळ संघाचा युवा खेळाडू. आतापर्यंत क्रिकेट विश्वाला टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ज्ञात होता. मात्र सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमुळे क्रिकेटविश्वाला नामसाधर्म्य असलेला आणखी एक खेळाडू मिळाला. (syed mushtaq ali t20 trophy 2021 young Mohammad Azharuddin cricket journey)
हा ज्युनिअर मोहम्मद अझरुद्दीने या स्पर्धेत केरळाचं प्रतिनिधित्व करतोय. या ज्युनिअर अझरुद्दीची गेल्या काही दिवसांमध्ये क्रिकेट विश्वात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुये. त्याचं कारणही तसंच आहे. या पठ्ठ्याने मुंबईविरोधात तडाखेदार शतकी कामगिरी केली.
या स्पर्धेत 13 जानेवारीला मुंबई विरुद्ध केरळ यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात अझरुद्दीने शतकी खेळी केली. टी 20 म्हणजे क्रिकेटचा झटपट प्रकार. दोन्ही संघांना प्रत्येकी 120 चेंडू खेळायला मिळतात. यामध्ये प्रत्येकाला फलंदाजीची संधी मिळतेच असं नाही. या प्रकारात साधरणपणे फलंदाजांनी अवघ्या काही चेंडूत तडाखेदार कामगिरीची अपेक्षा असते. मात्र अझरुद्दीने शानदार शतक लगावलं ते ही फक्त 37 चेंडूमध्ये शतक लगावलं. विशेष म्हणजे हे शतक त्याने विजयी आव्हानाचं पाठलाग करताना लगावलं.
टी 20 मध्ये आव्हानाचं पाठलाग करताना शतक लगावणं अनुभवी फलंदाजांनाही जमत नाही. पण अझरुद्दीने हा पराक्रम केला. मुंबईने विजयासाठी 197 धावांचे आव्हान दिले. या विजयी आव्हानाचे पाठलाग करताना अझरुद्दीनने रॉबिन उथप्पासह शानदार सुरुवात केली. अझरुद्दीनने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक लगावलं. 129 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर उथप्पा बाद झाला.
उथप्पानंतर संजू सॅमसन मैदानात आला. संजूसोबत अझरुद्दीनने 61 धावा जोडल्या. या दरम्यान अझरुद्दीनने 37 चेंडूत शानदार शतक लगावलं. मात्र संजू सॅमसननेही विजयासाठी काही धावा हव्या असताना 22 धावांवर बाद झाला.
दुसऱ्या बाजूला विकेट जात होते. पण अझरुद्दीननवर याचा काहीच परिणाम दिसून येत नव्हता. अझरुद्दीनने जोरदार फटकेबाजी करत होता. अझरुद्दीनने सचिन बेबीसह केरळाला शानदार विजय मिळवून दिला. अझरुद्दीनने 54 चेंडूत 9 फोर आणि 11 सिक्ससह नाबाद 137 धावा ठोकल्या.
अझरुद्दीनने 15 नोव्हेंबर 2015 मध्ये केरळकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गोव्याविरोधात पदार्पण केलं. अझरुद्दीनने आतापर्यंत आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 22 सामने खेळले आहेत. यात त्याने 25. 91 च्या सरासरीने आणि 63.76 च्या स्ट्राईक रेटसह 959 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके लगावली आहेत.
तसेच अझरुद्दीनने 24 लिस्ट ए आणि 22 टी 20 सामने खेळले आहेत. या 24 लिस्ट ए सामन्यात अझरुद्दीनने 3 अर्धशतकांसह 445 धावा केल्या आहेत. तर 22 टी सामन्यात 1 शतकासह 404 धावांची नोंद आहे. मुंबईविरोधात केलेली नाबाद 137 धावांची खेळी ही त्याची टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
अझरुद्दीनने मुंबईविरोधात शानदार नाबाद 137 धावांची खेळी केली. या खेळीमुळे केरळ संघाचं देशभरात नाव झालं. केरळ क्रिकेटसाठी हा अभिमानास्पद बाब आहे. अझरुद्दीनच्या या खेळीचं कौतुक म्हणून त्याला सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केरळ क्रिकेट बोर्डाचे सचिव असलेल श्रीजीत नायर यांनी दिली.
अझरुद्दीनने 137 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सन्मान राशी म्हणून प्रति धावानुसार हजार रुपये यानुसार एकूण 1 लाख 37 हजार इतकी राशी देऊन त्याला सन्मानित केलं जाणार असल्याचं नायर म्हणाले.
मोहम्मद अझरुद्दीनचा जन्म आजपासून जवळपास 27 वर्षांपूर्वी 22 मार्च 1994 रोजी केरळात झाला. जन्मानंतर काही दिवसांनी नामकरण सोहळा पार पडतो. अझरुद्दीनच्या पालकांना त्याचं आणखी दुसरं नाव ठेवायचं होतं. मात्र त्याच्या मोठ्या भावाने म्हणजेच कमरुद्दीनने आपल्या धाकट्या भावाचं नाव अझरुद्दीन ठेवलं. हे नाव ठेवण्यामागे ही तसंच कारण.
कमरुद्दीन हा क्रिकेटचाहता. तो अझरुद्दीनचा मोठा फॅन. त्यामुळे आपल्या भावाचंही नाव अझरुद्दीन ठेवायचं, असं कमरुद्दीनने ठरवल. असा हा या नावामागचा भन्नाट किस्सा. अझरुद्दीनने आपल्या भावाच्या क्रिकेट प्रेमाला नव वळण दिलं. कमरुद्दीनने अझरुद्दीनचा फॅन असल्याने आपल्या धाकट्या भावाला त्याचं नाव दिलं. पण अझरुद्दीनने नावानुसार करिअर म्हणून क्रिकेट निवडलं. आज अझरुद्दीन केरळचं प्रतिनिधित्व करतोय.
अझरुद्दीनने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत शानदार शतक ठोकत सुरुवात केली आहे. अजून स्पर्धा बाकी आहे. त्यामुळे अझरुद्दीन या उर्वरित सामन्यात कशाप्रकारे कामगिरी करतो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
(syed mushtaq ali t 20 trophy 2021 young Mohammad Azharuddin cricket journey)