नागपूर : अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने भारताला नागपूर वन डेत आश्चर्यकारक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना विजय शंकरने दोन फलंदाजांना बाद केलं आणि विजय खेचून आणला. भारताने दिलेलं 251 धावांचं आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाची सर्वबाद 242 अशी दाणादाण उडाली. विजय शंकरने निर्णायक ठरलेल्या अखेरच्या षटकात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं.
या विजयासोबतच भारताने भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याअगोदर हैदराबाद वन डेतही भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 251 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळीच वेसन घालत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताकडून जसप्रीत बुमरा आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जाडेजा आणि केदार जाधवनेही प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अक्षरशः तारांबळ केली. बुमराने 10 षटकांमध्ये फक्त 29 धावा खर्च केल्या आणि भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला.
त्याअगोदर विराट कोहलीने दणदणीत शतक ठोकत भारताची धावसंख्या 250 पर्यंत नेली. त्याने 120 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 116 धावांची खेळी केली. भारताला रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. रोहितला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर 21 धावा करुन शिखर धवन माघारी परतला. अंबाती रायुडूलाही केवळ 18 धावा करता आल्या. विराटला कुणीही साथ देत नसताना विजय शंकरने मात्र 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
विजय शंकरने अगोदर फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे विराटचं शतक सार्थकी लागलं. अखेरच्या षटकात 11 धावांची आवश्यकता असताना सेट फलंदाज मार्कस स्टॉईनिसला विजय शंकरने 52 धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेल्या अडम झम्पालाही विजय शंकरने माघारी धाडलं आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.