चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघाच्या घोषणेपूर्वीच भारतीय संघात चिंतेचं वातावरण पसरलं आहे, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू, नुकताच कर्णधारपद भूषवलेला जसप्रीत बूमराह याची तब्येत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने गमावली असली तर त्या मालिकेत बुमरहाने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक, 32 विकेट्स टिपल्या होत्या. शेवटच्या सामन्यातच तो थोडा त्रस्त दिसला होता, त्यामुळे त्याने शेटच्या इनिंगमध्ये गोलंदाजी केली नव्हती. त्यानंतरच बुमराहच्या पाठीला दुकापत झाली असून तो बराच त्रस्त असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळेच तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही असा सवालही सध्या लोकांच्या मनात आहे. दुखापतीमुळे त्याला बेड रेस्टचा सल्ला देण्यात आल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली होती. मात्र आता याचसंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. खुद्द जसप्रीत बुमराहनेच पुढे येत त्याच्या आजारपणाबद्दल सुरू असलेल्या चर्चांबद्दल खुलासा करत सर्वांची शाळा घेतली आहे.
बुमराहच्या दुखापतीबद्दलची चर्चा खोटी ?
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर बुमराहच्या पाठीवर सूज आल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता. त्यामुळे त्याला ‘बेड रेस्ट’चा सल्ला देण्यात आला आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. म्हणजेच त्याची दुखापत बरी होईपर्यंत त्याला पूर्णपणे आराम करावा लागेल. एवढचं नव्हे तर बुमराहला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)च्या सेंटर ऑफ एक्सिलेंसचा दौरा करावा लागणार आहे, पण त्याची तारीख अद्याप निश्चित नाही, असाही दावा करण्यात आला होता. मात्र आता या सर्व चर्चांवर खुद्द बुमराहनेच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने X या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट करत त्याच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबद्दल खुलासा करत त्या खऱ्या नसल्याचे स्पष्ट केले. हे दावे ऐकून आपल्याला हसू येत असल्याचेही त्याने नमूद केले.
बुमराहची पोस्ट
X वर एक ट्विट शेअर करताना जसप्रीत बुमराहने लिहिले, ‘मला माहित आहे की खोट्या बातम्या पसरवणे सोपे आहे पण यामुळे मला हसू आले. Sources unreliable , सूत्रं अविश्वसनीय आहेत’ असा टोला लगावत बुमराहने त्याच्या आजारपणाबद्दल सुरू असलेल्या सर्व चर्चांवा पूर्णविराम दिलाय. बुमराहला सिडनी क्रिकेट मैदानावर दुखापत झाली होती. पहिल्या डावात त्याला पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करता आली नाही आणि नंतर त्याला मैदान सोडावे लागले. यानंतर त्याला स्कॅनिंगसाठीही पाठवण्यात आले. या घटनेनंतर त्याच्या दुखापतीबाबत अनेक बातम्या समोर आल्या, मात्र बीसीसीआयने अद्याप त्याच्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहने 32 विकेट घेतल्या, या दमदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीर खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले. तर गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात बुमराहचे सर्वात मोठे योगदान होते. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. बुमराहची दुखापत किती गंभीर आहे, हे संघाची घोषणा झाल्यानंरच कळेल.