लंडन : कधीही फिटनेसच्या कारणास्तव बाहेर न बसणारा टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी अखेर क्रिकेटमधून एक्झिट घेण्याच्या मूडमध्ये आहे. कारण, या विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेऊ शकतो. बीसीसीआयमधील सूत्रांनुसार, धोनीला निवृत्ती घेण्यासाठी कुणीही दबाव टाकणार नाही. पण धोनी स्वतःहूनच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. सेमीफायनल किंवा फायनल हा सामना धोनीचा अखेरचा सामना असू शकतो.
बीसीसीआयमधील सूत्रांच्या माहितीनुसार, धोनीचा अंदाज लावणं कठीण आहे. त्याने कसोटीतून अचानक निवृत्ती घेतली, कर्णधारपदही अचानक सोडलं आणि या निर्णय देखील तो अचानक घेऊ शकतो. सध्याची निवड समिती ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीपर्यंतची वाट पाहू शकते. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी सुरु होईल. टी-20 विश्वचषकात धोनीची रिप्लेसमेंट कोण यावर चर्चा होणार आहे.
भारतीय संघासाठी धोनीचं मूल्य वेगळं सांगण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीमध्ये भारतासाठी तो तारणहार ठरतो. पण या विश्वचषकात त्याने फलंदाजीमध्ये खास कामगिरी केलेली नाही. सात सामन्यांमध्ये 93 च्या स्ट्राईक रेटने त्याच्या नावावर केवळ 223 धावा आहेत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांनीही धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण धोनीचे नेतृत्त्वगुण पाहता त्याचं संघातील स्थान कायम सुरक्षित राहिलं.
संघ व्यवस्थापनाकडून 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळीच निर्णय घेतला जाणार होता. पण त्याला आणखी दोन वर्षे म्हणजे विश्वचषकापर्यंत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. धोनीने फलंदाजीमध्ये खास कामगिरी केलेली नसली तरी भारताने सेमीफायनलपर्यंत मजल मारली आहे. यानंतरच धोनीवर निर्णय घेतला जाईल, असं एका माजी खेळाडूने सांगितलं.
विश्वचषकानंतर महत्त्वाच्या मालिका
विश्वचषकानंतर लगेचच टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. येत्या 3 ऑगस्टपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होत आहे. यात टीम इंडियाला टेस्ट मॅच, वनडे आणि टी 20 सामने खेळायचे आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याला विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला गैरहजर रहाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या दोन्ही तगड्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.