मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने विश्वचषकानंतर आपला 11 खेळाडूंचा संघ जाहीर केलाय, ज्यात बाराव्या खेळाडूचाही समावेश आहे. यामध्ये आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीलाही स्थान मिळालेलं नाही. विश्वचषकात खेळलेल्या भारतीय संघापैकी सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना स्थान देण्यात आलंय. तर बारावा खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचं नाव आहे. इंग्लंडच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.
रोहित शर्माने या विश्वचषकात 9 सामन्यांमध्ये 98.33 च्या सरासरीने 648 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 शतकांचाही समावेश आहे. यामध्ये तीन शतकं त्याने सलग ठोकली आहेत. आयसीसीने रोहित शर्माला सलामीवीर फलंदाज म्हणून स्थान दिलंय, पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचाही संघात समावेश नाही. दुसरा सलामीवीर म्हणून विश्वविजेता इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयला संधी देण्यात आली आहे. जेसन रॉयने या विश्वचषकात 8 सामन्यात तब्बल 115.36 च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. दुखापतीमुळे काही सामन्यांना जेसन रॉय मुकला होता. विशेष म्हणजे जेसन रॉय मुकलेल्या तीन सामन्यांमध्येच इंग्लंडचा पराभव झाला होता.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचाही आयसीसीच्या संघात तिसऱ्या स्थानावर समावेश आहे. आयसीसीच्या संघात विल्यम्सनला कर्णधाराचा मान देण्यात आलाय. विल्यम्सनने 10 सामन्यात 74.97 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत आणि आपल्या संघाला त्याने फायनलपर्यंतही नेलं.
मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनचा समावेश आहे. या विश्वचषकात शाकिबने अष्टपैलू कामगिरी करत 8 सामन्यात 606 धावा केल्या. सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांच्या यादीत तो रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाकिबने साखळी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाही विक्रम मोडित काढला. सचिनने 2003 च्या विश्वचषकात ग्रुप स्टेजमध्येच 586 धावा केल्या होत्या. शाकिबच्या 606 धावांमध्ये दोन शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय गोलंदाजीमध्येही त्याने चांगली कामगिरी करत 11 विकेट्स नावावर केल्या.
आयसीसीने मधल्या फळीत इंग्लंडचा ज्यो रुट आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला स्थान दिलंय. बेन स्टोक्सने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अनेक सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज एलेक्स कॅरी आयसीसीच्या संघाचा यष्टीरक्षक आहे.
आयसीसीच्या गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर, न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन, भारताचा जसप्रीत बुमरा आणि बारावा खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा समावेश करण्यातत आलाय. मिचेल स्टार्कने 10 सामन्यात 27, जोफ्रा आर्चरने 20 (11), लॉकी फर्ग्युसन 21 (09), जसप्रीत बुमरा 18 (09) आणि ट्रेंट बोल्टने 10 सामन्यात 17 विकेट नावावर केल्या आहेत.
आयसीसीचा संपूर्ण संघ
रोहित शर्मा, जेसन रॉय, केन विल्यम्सन, शाकिब अल हसन, ज्यो रुट, बेन स्टोक्स, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, लॉकी फर्ग्युसन, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट (बारावा खेळाडू)