नवी दिल्ली : विश्वचषकातील मच अवेटेड भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एका तिकिटाची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. 2013 नंतर भारत आणि पाकिस्तान यांचा सामना फक्त आयसीसी आणि आशिया क्रिकेटच्या मालिकांमध्येच होतो. ब्रिटेनमध्ये लाखोंच्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात. त्यामुळे या महामुकाबल्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. 20 हजार क्षमता असलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाची खिडकी उघडताच सर्व तिकिटांची विक्री झाली. पण ज्यांनी तिकिटं घेतली आहेत, ते लोक यातून मोठा नफा कमावत आहेत.
या लोकांकडून तिकीट घेऊन त्याची पुन्हा विक्री करणाऱ्या वेबसाईटच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 480 तिकीट विक्रीसाठी आले. यामध्ये गोल्ड, प्लॅटिनम आणि ब्राँझचाही समावेश होता. ब्राँझ आणि सिल्वर कॅटेगरीचे तिकीट पूर्णपणे विकण्यात आले आहेत, ज्याची किंमत 17 हजार ते 27 हजार रुपयांपर्यंत होती. मूळ किंमत सांगण्यात आलेली नाही, पण रिसेलमध्ये तिकिटांतून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्यात आलाय.
शुक्रवारपर्यंत 58 गोल्ड आणि 51 प्लॅटिनम श्रेणीतील तिकीट उपलब्ध होते, ज्याची किंमत 47 हजार रुपयांपासून ते 62 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. ब्राँझ आणि सिल्वर कॅटेगरीच्या तिकिटांमध्ये पाच हजार रुपयांचं अंतर आहे. ज्या भागात दारु पिण्याची परवानगी आहे, त्याच तिकिटांना जास्त मागणी आहे. या वेबसाईटने मैदानाचा नकाशा बनवून तिकिटांची माहिती दिली असून सुविधांबाबतही सांगितलं आहे.
रिसेलचे तिकीट प्रेक्षकाला ईमेलद्वारे कंफर्म केले जातील आणि तिकीट हातात कसं मिळेल याचीही माहिती दिली जाईल. या वेबसाईटने अटींमध्ये स्पष्ट केलंय की आम्ही मार्केटप्लेस असून या तिकिटांच्या किंमती मूळ तिकिटांपेक्षा जास्त असू शकतात. याचा आयोजकांशी कोणताही संबंध नसेल.
भारताचा पाकिस्ताननंतरचा सामना अफगाणिस्तान आणि इग्लंडविरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या रिसेल तिकिटांची किंमत 7 – 15 हजार रुपये आहे. तर यजमान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठीचं रिसेल तिकीट 20 – 45 हजार रुपयांपर्यंत विकलं जातंय.
विश्वचषकात पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारताविरुद्ध जिंकता आलेलं नाही. भारताने आतापर्यंत दोन वेळा 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे, तर पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्त्वात 1992 मध्ये विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.
या विश्वचषकात भारताचे आतापर्यंत तीन सामने झाले आहेत, ज्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला, तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघ 5 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानने चार सामने खेळले असून दोन पराभवांचा सामना करावा लागलाय. पाकिस्तानचाही एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे पाकिस्तान 3 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.