नागपूर- ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. ही मालिका भारताला 3-0 ने जिंकायची आहे. कारण या निकालावरच भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं तिकीट निश्चित होणार आहे. त्या दृष्टीकोनातून भारतीय मातीत फलंदाज आणि गोलंदाजांचा कस लागणार आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 177 धावांवर गारद केला. गोलंदाजांनी कमावलं आणि फलंदाजांनी गमावलं अशीच काहीशी स्थिती दुसऱ्या दिवशी झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा वगळता एकही फलंदाज मैदानात तग धरु शकला नाही. ऑस्ट्रेलियन फिरकीपटून टॉड मर्फिनं आपल्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. मर्फिनं केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि श्रीकर भारत यांना तंबूचा रस्ता दाखवला.
टॉड मर्फिनं पदार्पणाच्या सामन्यातच 5 गडी बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. केएल राहुल 20 या धावसंख्येवर असताना मर्फीनं त्याला गोलंदाजी करत स्वत:च झेल घेत मैदानाबाहेर पाठवलं. त्यानंतर रविचंद्रन अश्विनला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 62 चेंडूत 23 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराही मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. अवघ्या 7 या धावसंख्येवर असताना स्कॉट बोलँडकरवी झेल घेत बाद केलं. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा असताना मर्फीच्या गोलंदाजीसमोर अक्षरश: नांगी टाकली. अवघ्या 12 या धावसंख्येवर बाद होत तंबूत परतला. श्रीकर भारतही पदार्पणाच्या सामन्यात साजेशी कामगिरी करु शकला नाही. अवघ्या 8 या धावसंख्येवर पायचीत होत बाद झाला.
Virat Kohli’s poor form continues in Test cricket !! #INDvAUS #viratkholiOUT pic.twitter.com/we2RaCRYMJ
— BII2 (@realbii2) February 10, 2023
जेसन क्रेझानंतर मर्फी हा दुसरा गोलंदाज आहे, ज्याने भारतात पाच गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. क्रेझाने नागपूरच्या मैदानात नोव्हेंबर 2008 साली 8 गडी बाद करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. तसेच पदार्पणाच्या सामन्यात 5 गडी बाद करण्याच्या यादीत मर्फी ऑस्ट्रेलियाचा 37 वा खेळाडू आहे.
इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.