कोल्हापूरचा भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे याने महाराष्ट्राचा 12 वर्षांचा ओलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपविला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय नेमबाजीत कांस्य पदक मिळविले आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुसाळे याला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले असताना आता मध्य रेल्वेने देखील त्याला नोकरीत प्रमोशन दिले आहे. आता स्वप्नील कुसळे याला सीएसएमटी हेडक्वॉर्टरमधील स्पोर्ट्स सेलमध्ये ऑफीसर ऑन स्पेशल ड्यूटी (OSD) म्हणून बढती देण्याचे आदेश मध्य रेल्वेने काढले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आपल्या उत्तुंग यशामुळे स्वप्नीलने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी आज मंत्रालयातील दालनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसळे यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव केल्याबद्दल त्यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसळे यांना शुभेच्छा देत एक कोटी रुपयांचे बक्षिस देखील जाहीर केले आहे. पॅरीस ऑलिंपिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कुसळे याच्या कुटुंबियांशी आज मंत्रालयातील दालनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसळे कुटूंबियांचे अभिनंदन केले. कॉंग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी स्वप्नील याचे कौतूक करीत पाच लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
मध्य रेल्वेचे ट्वीट येथे पाहा –
Central Railway honours it’s Olympic medalist Mr Swapnil Kusale. In an apt recognition to his achievement in the Paris Olympics he has been promoted as Officer on Special Duty in sports cell.
Best wishes for the new role, champion. 🥉💐 pic.twitter.com/LPURPyox2p— Central Railway (@Central_Railway) August 1, 2024
स्वप्नील कुसळेचे यश पूर्ण देश साजरा करीत आहे. तरी खेळांविषयीची सरकारी अनास्था स्वप्निल याच्यादेखील आड आली होती. इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तात त्याचे मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी ही दुखरी बाजू सांगितली. ते म्हणाले की, ‘पॅरिस ऑलम्पिकला जाण्याआधी महाराष्ट्र सरकारने स्वप्निल याला 50 लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते, आम्ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडूनही आम्हाला एक पैसाही मिळाला नाही, सरावाला स्वप्निलला रोज 200 गोळ्यांची आवश्यकता असते आणि एक गोळी पन्नास रुपयांना मिळते. आज त्याने ब्राँझ जिंकले म्हणून कौतुक होतं आहे. पण जर सरकारी मदत वेळेवर मिळाली असती तर आज चित्र अजून वेगळे असते असेही ते म्हणाले.