नवी दिल्ली : न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) धक्कादायक निर्णय घेतला आहे. ट्रेंट बोल्डने न्यूझीलंड क्रिकेटच्या करारापासून (Cricket Agreement) स्वतःला दूर केल्याची माहिती मिळाली आहे. घेतलेल्या निर्णयानंतर ट्रेंट बोल्ट फार कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे असं म्हटलं जात आहे. त्याचे कुटुंब त्याच्यासाठी अधिक महत्वाचे आहे आणि त्याला तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे असं ट्रेंट बोल्टने जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे ट्रेंट बोल्ट जगभरात होणाऱ्या टी-20 लीगसाठी उपलब्ध असेल. आत्तापर्यंत भारतात ट्रेंट बोल्टने अधिक सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याचा चाहतावर्ग देखील भारतात अधिक आहे.
ट्रेंट बोल्टने न्यूझीलंडकडून आत्तापर्यंत 78 कसोटी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर 130 हून अधिक वनडे सामनेही खेळले आहेत. बोल्टने हा निर्णय अत्यंत कठीण असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर “हा खूप कठीण निर्णय होता. न्यूझीलंड क्रिकेटकडून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.
“न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. गेल्या 12 वर्षात मी जे काही मिळवले त्याचा मला अभिमान आहे. माझा निर्णय माझी पत्नी आणि माझ्या तीन मुलांसाठी आहे. कुटुंब ही माझ्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. मी माझ्या आयुष्यात क्रिकेटच्या आधी कुटुंब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असंही बोल्ट पुढे म्हणाला.
बोल्ट मात्र महत्त्वाच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघात दिसतो. आता देशासाठी खेळत राहण्याची माझी इच्छा आहे. सध्या माझ्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी करण्याची कौशल्य अजून शिल्लक आहे. पण करार नसल्यामुळे बोल्टच्या निवडीची शक्यता मात्र कमी झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी बोल्टच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे. डेव्हिड व्हाईटने मात्र बोल्टला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बोल्ट सध्या वनडे क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज आहे. त्याने 93 सामन्यात 169 विकेट घेतल्या आहेत.