अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील आठव्या सामन्यात टीम इंडियाने जपानसमोर 340 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने कॅप्टन मोहम्मज अमान याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर 50 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. तसेच वसईकर आयुष म्हमात्रे आणि केपी कार्तिकेय या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच इतर फलंदाजांनीही छोटेखानी खेळी करत टीम इंडियाला 300 पार पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांवर सर्व जबाबदारी आहे. गोलंदाज जपानला किती धावांवर रोखतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
जपानने टॉस जिंकत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं.आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र वैभवला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. भारताला 65 धावांवर पहिला झटका लागला. वैभव सूर्यवंशी 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर अवघ्या काही षटकांनंतर आयुष म्हात्रे माघारी परतला. आयुषने 54 धावांची खेळी केली. आंद्रे सिद्धार्थ याने 35 धावा जोडल्या. केपी कार्तिकेयने 49 बॉलमध्ये 116.33 च्या स्ट्राईक रेटने 57 रन्स केल्या. निखील कुमारने 17 बॉलमध्ये 12 धावा जोडल्या. तर हरवंश सिंग याला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हरवंश 1 धाव करुन माघारी परतला. त्यामुळे भारताची 46 ओव्हरमध्ये 6 आऊट 289 अशी स्थिती झाली.
त्यानंतर हार्दिक राज आणि कॅप्टन मोहम्मद अमान या दोघांनी 4 ओव्हरमध्ये 50 धावांची नाबाद भागीदारी केली. मोहम्मद अमानने 118 बॉलमध्ये 7 चौकारांसह नाबाद 122 धावांची खेळी केली.तर हार्दिक राज याने 12 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 25 रन्स केल्या. जपानकडून किफर यामामोटो-लेक आणि ह्यूगो केली या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर आरव तिवारी आणि चार्ल्स हिन्झे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, निखिल कुमार, केपी कार्तिकेय, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, समर्थ नागराज, युद्धजित गुहा आणि चेतन शर्मा.
जपान प्लेइंग ईलेव्हन : कोजी हार्डग्रेव्ह आबे (कर्णधार), आदित्य फडके, निहार परमार, काझुमा काटो-स्टाफोर्ड, चार्ल्स हिन्झे, ह्यूगो केली, टिमोथी मूर, किफर यामामोटो-लेक, डॅनियल पँकहर्स्ट (विकेटकीपर), आरव तिवारी आणि मॅक्स योनेकावा लिन.