बंगळुरु : आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) विराटच्या बंगळुरुकडून खेळणाऱ्या देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikal) सध्या सुरु असलेल्या विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2020-21) दमदार कामगिरी करत आहे. देवदत्त चांगलाच फॉर्मात आहे. देवदत्तने रेल्वे विरुद्ध खेळताना शनिवारी (27 फेब्रुवारी) शतकी खेळी केली. यासह त्याने या स्पर्धेतील शतकांची हॅट्रिक पूर्ण केली. (Vijay Hazare Trophy 2021 devdutt padikkal Scored consecutive third century)
देवदत्तने बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रेल्वेज विरुद्ध खेळताना शानदार शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हे शतक देवदत्तच्या या स्पर्धेतील सलग तिसरं शतक ठरलं. देवदत्तने आयपीएलच्या 13 व्या मोसमात आरसीबीकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली होती.
कर्नाटकने टॉस जिंकून रेल्वेजला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. रेल्वने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 284 धावा केल्या. यानंतर 285 धावांच्या विजयी आव्हानसाठी कर्नाटक फलंदाजीसाठी आली. कर्नाटककडून देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार रवीकुमार समर्थ मैदानात आले. या दोघांनी रेल्वेच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. मैदानाच्या प्रत्येक दिशेला फटके मारले. या दोघांनीच विजयी आव्हान पार पाडले. अवघ्या 40.3 ओव्हरमध्ये कर्नाटकाच्या सलामी जोडीने हे विजयी आव्हान पूर्ण केलं. या सलामी जोडीने 285 धावांची भागीदारी केली.
देवदत्तने 125 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 145 धावांची स्फोटक खेळी केली. तर रवीकुमार समर्थनेही 118 बॉलमध्ये 17 चौकारांसह 130 धावा केल्या.
दरम्यान याआधी देवदत्तने या स्पर्धेत या आधी केरळ आणि ओडिसा विरुद्ध ही प्रत्येकी 1 शतक लगावलं आहे. या दोन्ही सामन्यात कर्नाटकाचा विजय झाला होता. देवदत्तने 24 फेब्रुवारीला ओडिसा विरुद्ध 152 धावा केल्या. तर 2 दिवसांनी अर्थात 26 फेब्रुवारीला केरळ विरोधात नाबाद 126 धावा चोपल्या. या सामन्यात कर्नाटकाचा 9 विकेट्सने विजय झाला होता.
या विजयासह कर्नाटक ग्रृप सीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. कर्नाटकाने या स्पर्धेतील 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर केवळ एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
देवदत्तने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील एकूण सर्वच म्हणजेच 14 सामने खेळले. यामध्ये त्याने 126.54 च्या स्ट्राईक रेटने तसेच 33.71 च्या सरासरीने 472 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. देवदत्तची 74 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
संबंधित बातम्या :
(Vijay Hazare Trophy 2021 devdutt padikkal Scored consecutive third century)