Vinod Kambli : विनोद कांबळी सचिनबद्दल पुन्हा बोलला, पुन्हा चर्चांना उधाण; आता काय म्हणाला?

| Updated on: Dec 13, 2024 | 11:46 AM

विनोद कांबळीचा अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. पण विनोदने एका मुलाखतीत त्याच्या आजाराविषयी माहिती दिली आहे, तसेच सचिन तेंडुलकरने केलेल्या मदतीचा खुलासा केला आहे. कांबळीला यूरीनशी संबंधित आजार आहे आणि त्यांची आर्थिक स्थितीही कमकुवत असल्याचं त्याने सांगितलं.

Vinod Kambli : विनोद कांबळी सचिनबद्दल पुन्हा बोलला, पुन्हा चर्चांना उधाण; आता काय म्हणाला?
विनोद कांबळी
Image Credit source: social media
Follow us on

Vinod Kambli Sachin Tendulkar : भारतातील टॅलेंटेड क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेला विनोद कांबळी सध्या विपण्णावस्थेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. सचिन तेंडुलकरचा हात पकडताना तो या व्हिडीओत दिसत होता. तसेच सचिनला त्याने ओळखले नसल्याचंही जाणवत होतं. त्याची ही अवस्था पाहून सर्वच हळहळले. सुनील गावस्करपासून ते कपिलदेवपर्यंत सर्वचजण त्याच्या मदतीला धावून आले आहे. त्यानंतर विनोद कांबळीने एक मुलाखत दिली आहे. त्यात त्याने त्याला कोणता आजार झालाय याची माहिती दिली आहे. तसेच सचिन तेंडुलकरने त्याला खरोखरच मदत केली नव्हती का? त्याचा खुलासाही त्याने या मुलाखतीत केला आहे.

विनोद कांबळीची अवस्था दारू प्यायल्यामुळे अशी झाल्याचं सांगितलं जातं. दारूच्या नशेत असल्यानेच विनोद कांबळी सचिनला ओळखू शकला नसल्याचीही सोशल मीडियावर चर्चा होती. पण विनोद कांबळीने त्याच्या आजाराचं खरं कारण सांगितलं आहे. त्यामुळे वास्तव समोर आलं आहे. विनोद कांबळीला यूरीनशी संबंधित आजार आहे. त्यामुळे त्याला वारंवार लघवीला जावं लागतं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची पत्नी आणि मुलं त्याची काळजी घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. या मुलाखतीत बोलताना विनोद कांबळी अडखळत बोलत असल्याचं दिसून आलं. यावरून त्याची प्रकृती कशी आहे याचा अंदाज येतो. हार्ट अटॅक आला होता, तेव्हा मी दारू सोडली होती, असं विनोद कांबळीने स्पष्ट केलंय. मी सहा महिन्यांपूर्वीच दारू सोडली. पूर्वी प्यायचो. आता पित नाही. मुलांसाठीच मी दारू सोडलीय. तरीही मी पुन्हा पुनर्वसन केंद्रात जायला तयार आहे, असंही त्याने सांगितलं.

सचिनने मदत केली नाही ?

सचिनने तुला मदत केलीच नाही का? असा सवाल त्याला करण्यात आला. त्यावर त्याने आपली चूक कबूल केली. त्यावेळी मी नैराश्यात होतो. त्यामुळेच मी सचिनने मला मदत केली नसल्याचं म्हटलं होतं. पण सचिनने मला दोनदा सर्जरीसाठी मदत केली होती. त्याच्यामुळे मी 9 वेळा टीम इंडियात पुनरागमन करू शकलो. मी जेव्हा जेव्हा संघात आलो, तेव्हा तेव्हा सचिनने मला पिचवर कसं टिकून राहायचं हे सांगितलं. आता सचिन आणि माझ्यात चांगले संबंध आहेत. सर्व काही ठिक झाले आहे. आम्ही चांगले मित्र आहोत, असं विनोद म्हणाला.

कशी केली मदत ?

आम्ही क्रिकेटपटू आहोत. एखाद्या गोष्टीने आम्ही लगेच दुखावलो जातो. जेव्हा आम्ही बाद होतो, तेव्हा आमच्या मनाला लागतं. पण सचिनने माझ्यासाठी सर्व काही केलं. 2013मध्ये माझे लिलावती रुग्णालयात दोन ऑपरेशन झाले. त्यावेळी सचिनने मदत केली. टीममध्ये कमबॅक करण्यासाठीही सचिननेच मदत केली. मागे मुलाखतीत मी नैराश्यात असताना सचिनने मदत केला नसल्याचा आरोप केला. मी सहज म्हणालो होतो. त्यानंतर मला चूक समजली. मी सचिनला फोन केला. त्यानंतर पुन्हा आमची मैत्री घट्ट झाली, असंही त्याने सांगितलं.

आर्थिक स्थिती कशी ?

तुझी आर्थिक स्थिती कशी आहे? असा सवाल त्याला करण्यात आला. तेव्हा अत्यंत वाईट आहे, असं तो म्हणाला. माझी पत्नीच मला पैशासाठी मदत करते. मी रिहॅब सेंटरमध्ये जायला तयार आहे. अजय जडेजानेही मदत करण्यासाठी फोन केला होता. मी पुन्हा एकदा कम बॅक करेन, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.