लंडन: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याच्या अलिकडच्या खेळानंतर क्रिकेटमधून तो केव्हा निवृत्ती घेणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर तर हा प्रश्न अधिकवेळा विचारला जात आहे. त्यामुळे अखेर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर पत्रकारांशी बोलताना कोहली म्हणाला, “नाही, धोनीने अजून आम्हाला त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल काहीही सांगितलेले नाही.”
यावेळी पत्रकारांनी कोहलीवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. सेमीफायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात धोनीच्या आधी हार्दिक पांड्याला का पाठवण्यात आले हा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोहली म्हणाला, “जर सामन्यात भारताची स्थिती खराब असेल तर पांड्याला एका बाजूची फलंदाजीची जबाबदारी स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने या सामन्यात आपली जबाबदारी पार पाडली. तसेच ज्या सामन्यात 6-7 षटके बाकी आहेत त्यात त्याने आक्रमक खेळी करावी असेही निश्चित करण्यात आले होते.”
या विश्वचषकात धोनीच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर कोहली म्हणाला, “बाहेरुन पाहणे नेहमीच सोप असते. आपल्याला नेहमी वाटते हे होऊ शकले असते, ते होऊ शकले असते. मात्र, आज धोनी जडेजासोबत फलंदाजी करत होता. त्यानंतर फलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार येणार होता. त्यामुळे धोनीने दुसऱ्या बाजूला जडेजा चांगला खेळत असताना एक बाजू सांभाळून धरली.” धोनीने सेमीफायलमध्ये 72 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या. धोनी धावबाद झाल्यानंतर सामना अगदीच न्यूझीलंडकडे झुकला.