मॅनचेस्टर (इंग्लंड) : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. रविवारी (16 जून) पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात विराटने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीने आपल्या 230 व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील 222 व्या डावात हा विक्रम रचला. कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत हा विक्रम केला आहे. सचिनने 284 व्या सामन्यातील 276 व्या डावांमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्या होत्या.
कोहलीला या सामन्यापूर्वी 11 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची गरज होती. त्याने पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीच्या चेंडूवर चौकार लगावत हा विक्रम नोंदवला. सचिन तेंडुलकरने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 2003 ला 12000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर 1999 मध्ये विश्वचषक सामन्यात भारत-पाक सामन्यात सचिनने 8000 धाव पूर्ण केल्या होत्या.
विराट कोहलीने 205 डावात 10000 धावा पूर्ण केल्या आहेत. पुढील एक हजार धावा विराटने 17 खेळींमध्ये पूर्ण केल्या. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज पाहिले तर, रिकी पॉन्टिंग यांनी 286 डावात 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. पॉन्टिंग एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण करणारा तिसरा क्रिकेटर आहे. तसेच भारतात 11000 धावा करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटर सौरव गांगुलीचाही समावेश आहे. गांगुलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 11 हजार 363 धावा केल्या आहेत.