फ्लोरिडा : क्रिकेट विश्वचषकातील (World Cup 2019) उपान्त्य फेरीतच टीम इंडियाचा पराभव झाल्याने चाहत्यांच्या मनाला चटका लागला होता. त्यामुळे हा पराभव कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्याही जिव्हारी लागणं साहजिकच आहे. त्या सामन्यानंतर काही दिवस सकाळ-सकाळी अत्यंत उदास वाटायचं, अशा भावना विराटने व्यक्त केल्या आहेत.
विश्वचषकाच्या साखळी सामन्यात दमदार कामगिरी केलेल्या भारताला न्य़ूझीलंडने उपान्त्य फेरीत पराभूत केलं
होतं. विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊन तीनपेक्षा जास्त आठवडे उलटले, मात्र विराटला या दुःखाच्या सावटातून बाहेर येण्यास दीर्घ काळ लागला. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या टी20 सामन्याच्या पूर्वसंध्येला फ्लोरिडामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
पराभवानंतर पुढचे काही दिवस सामन्याची आठवण येऊन उदास वाटायचं. काही दिवस फार कठीण गेले, असं कोहली म्हणाला. ‘पराभवाचा विचार करुन मन उदास व्हायचं. दिवसभर तुम्ही इतर गोष्टी करता. तुमच्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त होता. मात्र आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत. आता आम्ही त्या मनस्थितीतून बाहेर आलो आहोत. प्रत्येक संघाला पुढे जायलाच हवं. विश्वचषकात जे काही झालं, आम्ही त्याचा स्वीकार करतो’ असं कोहली म्हणतो.
‘वेस्ट इंडीजविरुद्धच्या दौऱ्यासाठी आम्ही उत्साही आहोत. सरावादरम्यान आम्ही चांगली कामगिरी करत आहोत’ असं कोहलीने नमूद केलं. भारतीय क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे, असंही कोहलीने सांगितलं.
‘ऋषभ पंतसारख्या युवा क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं, आपली क्षमता दाखवणं आणि स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. पंतमधील क्षमतेची आम्हाला जाणीव आहे. भारतीय संघासाठी त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करावी’ अशी इच्छाही विराटने बोलून दाखवली.