IPL 2023 : “…म्हणून आयपीलमधील आरसीबीचं कर्णधारपद सोडलं”, विराट कोहलीचा मोठा खुलासा

| Updated on: Mar 16, 2023 | 3:34 PM

आयपीएलच्या आतापर्यंतच्या पर्वात आरसीबीला एकदाही जेतेपद पटकावता आलं नाही. त्यात डब्ल्यूपीएलमध्ये वुमन्स संघाची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे विराट कोहली महिला संघाला एक कानमंत्र देत कर्णधारपद सोडण्यामागचं कारण सांगितलं.

IPL 2023 : ...म्हणून आयपीलमधील आरसीबीचं कर्णधारपद सोडलं, विराट कोहलीचा मोठा खुलासा
विराट कोहलीनं अखेर मौन सोडलं, आयपीएलमधील आरसीबीच्या कर्णधारपदावरून या कारणासाठी पायउतार
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : विराट कोहलीला क्रिकेटविश्वात रनमशिन म्हणून ओळखलं जातं. टेस्ट, वनडे आणि टी 20 फॉर्मेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. आयपीएलच्या एका पर्वात धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून आतापर्यंत विराट कोहली बंगळुरूसोबत आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात एकदाही संघाला जेतेपद पटकावता आलं नाही. आरसीबी संघ 2017 आणि 2019 पर्वात तर गुणतालिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर होता. आयपीएल 2021 पर्वानंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्स आणि आरसीबी सामन्यापूर्वी महिला खेळाडूंना कर्णधारपद सोडण्याचं कारण सांगितलं. “जेव्हा माझ्या कर्णधारपदाचा कार्यकाळ संपत आला होता, तेव्हा माझाच माझ्यावर विश्वास नव्हता. माझ्या आत कोणतीच रग नव्हती.”, असं विराट कोहलीने सांगितलं.

“ती फक्त माझी समज होती. मी एक माणूस म्हणून स्वत:ला समजवत होतो की, मी खूप चढउतार पाहिले आहेत. पण आता सांभाळणं कठीण आहे. आरसीबी टीम 2016 नंतर पहिल्यांदा 2020 मध्ये प्लेऑफमध्ये गेली नाही. त्यामुळे स्वत:वरचा विश्वास गमावला होता.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

डुप्लेसीच्या नेतृत्वात संघ तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला. “पुढच्या पर्वात नवे खेळाडू संघात आले. त्यांचे नवे विचार होते आणि एका संधीसारखं होतं. ते खूपच उत्साहित होते. पण वैयक्तिकरित्या मी उत्साहित नव्हतो. पण त्यांच्या सकारात्मकतेमुळे सलग तीन वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलो.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

“आता आम्ही प्रत्येक पर्वाची सुरुवात त्याच उत्साहाने करतो जे पहिलं होतं अगदी तसंच. संघाला यश मिळवून देणं ही सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्या खेळाडूत आत्मविश्वास कमी असेल तर दुसरे खेळाडू आत्मविश्वास वाढवतात”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

“युवा खेळाडू माझ्याकडे यायचे आणि विचारायचे की तू तो चेंडू हिट का केला नाही? तेव्हा मला वाटायचं की ते बरोबर बोलत आहे. मी मैदानात याबाबत विचारच करू शकलो नाही. कारण माझ्या डोक्यात आणखी काही विचार सुरु होते. मी विचार करायचो लोकं माझी फलंदाजी कशी पाहात आहेत. त्यामुळे मी नैसर्गिक खेळ विसरून गेलो होतो.”, असंही विराटने पुढे सांगितलं.

विराट कोहीलीने 2021 टी 20 विश्वचषक गमवल्याानंतर अचानक कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर लगेचच एकदिवसीय कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तसेच कसोटीच्या कर्णधारपदाही सोडलं. भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा भार हलका झाल्यानंतर आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला.