पुढे संधी मिळणार नाही हे धोनीला सांगा; सेहवागचा निवड समितीला सल्ला

| Updated on: Jul 19, 2019 | 8:56 AM

धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती कधी घ्यावी, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे, असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागाने व्यक्त केलं.

पुढे संधी मिळणार नाही हे धोनीला सांगा; सेहवागचा निवड समितीला सल्ला
Follow us on

नवी दिल्ली : धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती कधी घ्यावी, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे, असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने व्यक्त केलं. तसेच, आता निवड समितीनेही धोनीला त्यांची रणनिती सांगून द्यावी, असं आवाहन सेहवागने केलं. कारण, विश्वचषक संपल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. अशा वेळी 2011 मध्ये 28 वर्षांनी भारताला विश्वविजेते पद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आगामी विंडीज दौऱ्यातूनही वगळल्याची बातमी आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज धोनीच्या खेळावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यंदाच्या विश्वचषकात धोनी फार काही कमाल करु शकला नाही. त्यामुळे या विश्वचषकानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तर, माझ्या निवृत्तीबाबत मलाच कल्पना नाही, असं स्पष्टीकरण धोनीने दिलं होतं. मात्र, भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनी खेळणार नसल्याची चर्चा आहे.

या मुद्यावर विरेंद्र सेहवागने त्याचं मत मांडलं. धोनीला कधी निवृत्त व्हायचं आहे, हे त्याच्यावर सोडून द्या, असं सेहवागने म्हटलं.

“धोनीला कधी निवृत्ती घ्यायची आहे, हे त्याच्यावर सोडून द्या. निवड समितीने धोनीशी चर्चा करावी आणि त्याला स्पष्टपणे सांगावं की, ते आता धोनीला पुढे संधी देऊ शकत नाही. हे निवड समितीचं काम आहे”, असं एका इंग्रजी चॅनेलवरील चर्चेत सेहवाग म्हणाला.

स्वत:च्या निवृत्तीबाबतही सेहवागने एक खुलासा केला. “जर निवड समितीने तेव्हा मला माझ्या रणनितीबाबत विचारलं असतं, तर कदाचित मी त्यांना सांगू शकलो असतो”, असं सेहवागने सागितलं. सेहवागने निवृत्ती घेतली, तेव्हा संदीप पाटील हे निवड समितीचे अध्यक्ष होते. यावेळी पाटीलही या चर्चेत सहभागी झाले होते.

“सचिन तेंडुलकरशी त्यांच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यावर आणि राजिंदर सिंग हंस यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर सेहवागची जबाबदारी विक्रम राठोड यांच्यावर सोपवण्यात आली होती. आम्ही विक्रमला विचारलं, तेव्हा त्याने सेहवागशी बोलणं झाल्याचं सांगितलं होतं. मात्र, जर सेहवाग म्हणत आहेत, की त्यांना विचारण्यात आलं नव्हतं, तर याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो”, असं यावेळी पाटील म्हणाले.

“विक्रम माझ्याशी तेव्हा बोलला जेव्हा मी संघातून बाहेर झालेलो होतो. संघातून काढण्यापूर्वी तो माझ्याशी बोलला असता तर त्या चर्चेला काही अर्थ होता. खेळाडूला बाहेर काढल्यानंतर त्याच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. जर प्रसाद आता धोनीला संघातून बाहेर करतील आणि त्यानंतर त्याच्याशी बोलतील तर धोनी काय म्हणेल? तो स्थानिक क्रिकेट खेळेल आणि जर तो चांगला खेळला तर त्याला पुन्हा संघात घेता येईल. मुद्दा हा आहे, की निवड समितीला खेळाडूशी तेव्हा बोलायला हवं जेव्हा त्याला संघातून बाहेर केलेलं नसेल”, असंही सेहवाग म्हणाला.

संबंधित बातम्या :

… म्हणून जगातल्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकानेही धोनीचे आभार मानले

धोनीला 7 व्या क्रमांकावर का पाठवलं? कोहली आणि शास्त्रींना जाब विचारला जाणार?

धोनीने निवृत्ती घ्यावी ही कुटुंबीयांचीही इच्छा, धोनीच्या प्रशिक्षकांचा दावा

धोनीने निवृत्ती न घेतल्यास, BCCI भाग पाडणार?