मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावात गुंडाळला. त्यामुळे भारताला 292 धावांची मोठी आघाडी मिळाली. कांगारुंची फलंदाजी कापून काढण्यात मोठा वाटा उचलला तो म्हणजे जसप्रीत बुमराहने. एकट्या बुमराने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 6 विकेट्स काढल्या. बुमराहच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं. येईल तो फलंदाज बुमराहची गोलंदाजी चकवू पाहात होता, मात्र बुमराहने एकेकाला ओळीने तंबूत धाडलं.
बुमराहच्या याच गोलंदाजीवर सोशल मीडियातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. नेहमीच हटके ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही बुमराचं त्याच्या शैलीत कौतुक केलं. सेहवागने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शैलीत कवितेची ओळ ट्विट केली.
‘ऑस्ट्रेलिया के लिए पेन, जसप्रीत बुमराह दिस इयर बिगेस्ट गेन’, अशी आठवले स्टाईल कविता सेहवागने केली. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचं नाव टीम पेन आहे. त्याचाच संदर्भ घेत सेहवागने कवितेतून कोटी करण्याचा प्रयत्न केला.
ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो, “‘ऑस्ट्रेलिया के लिए पेन, जसप्रीत बुमराह दिस इयर बिगेस्ट गेन’. भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी, ऑस्ट्रेलियाला 151 धावात गुंडाळलं. हवामान चांगलं राहावं हीच प्रार्थना. भारतीय संघाच्या दमदार खेळामुळे त्यांनी या कसोटीत विजय मिळवावा”
Australia ke liye Pain ,
Jasprit Bumrah this years biggest gain.
What a great effort from India to bowl out Australia for 151.
I pray the weather stays well and India win this MCG Test for the brilliant cricket they have played #AUSvIND pic.twitter.com/Oy2vEC7nPF— Virender Sehwag (@virendersehwag) December 28, 2018
बुमराहची भेदक गोलंदाजी
तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत जसप्रीत बुमराहच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. एकट्या बुमराहने तब्बल 6 फलंदाजांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावात गुंडाळला. त्यामुळे भारताला तब्बल 292 धावांची आघाडी मिळाली. बुमराने 15.5 षटकात अवघ्या 33 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. बुमराच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अक्षरश: दाणादाण उडाली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं आहे. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 443 धावांवर पहिला डाव घोषित केला होता.
संबंधित बातमी