मुंबई : विविध पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर कोणत्या पोस्ट व्हायरल करतील याचा नेम नाही. भारतीय संघाचे माजी कर्णधारी आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी भाजपात प्रवेश केल्याची सध्या चर्चा आहे. याबाबत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात अनिल कुंबळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे.
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, अनिल कुंबळेने भाजप प्रवेशाच्या मेसेजचं खंडण केलंय. कुणीतरी जाणिवपूर्वक खोटा मेसेज व्हायरल केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अनिल कुंबळेने भाजपात प्रवेश केला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान मोदी आणि अनिल कुंबळे यांचा जुना फोटो नव्या अफवेसह व्हायरल केला जात आहे.
Noted cricketer Anil Kumble met the PM. @narendramodi pic.twitter.com/K00ddpjopB
— PMO India (@PMOIndia) August 1, 2014
फेसबुक आणि ट्वीटरवर या पोस्ट केल्या जात आहेत. अनिल कुंबळे आणि पंतप्रधान मोदी यांचा मेसेजमध्ये व्हायरल होणारा फोटो जुना आहे. 1 ऑगस्ट 2014 रोजी पीएमओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे हा मेसेज खोटा असल्याचं सिद्ध झालंय.
दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी संपर्क फॉर समर्थन या भाजपच्या कार्यक्रमांतर्गत अनेक दिग्गजांची भेट घेतली होती. शाह यांच्यासोबत या मंडळींचे फोटो व्हायरल करुनही अनेक अंदाज बांधण्यात आले होते.
अभिनेत्री माधुरी दीक्षित पुण्यातून भाजपकडून निवडणूक लढणार असल्याचाही दावा करण्यात आला होता. पण असं काहीही नियोजन नसल्याचं माधुरीच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं होतं. अक्षय कुमार, क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांच्याबाबतच्याही पोस्ट व्हायरल होत होत्या.