जालना : बाला रफिक शेख याने गतविजेत्या अभिजित कटकेला पराभूत करत ‘62 वी अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेची मानाची गदा पटकावली. अंतिम फेरीत बाला रफिकने अभिजित कटकेवर 11-03 गुणांनी मात केली. बाला रफिकने एकेरी पट, दुहेरी पट, ढाक या डावांचा अवलंब करुन अभिजितला पराभूत केले. यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविण्यात अभिजित यशस्वी होणार की, बाला रफिक शेख मानाची गदा उंचविणार, याबाबत तमाम कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र बाला रफिकने अभिजितला काटेकी टक्कर देत यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला.
कोण आहे बाला रफिक शेख आणि कसा होता त्याचा ‘महाराष्ट्र केसरी’पर्यंतचा प्रवास?
बाला रफिक हा मातीचा खेळाडू. तो मुळचा सोलापूरचा आहे. मात्र कुस्तीसाठी त्याने अवघ्या 13 व्या वर्षी आपलं घरं सोडलं आणि कोल्हापुरात आला. कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमिचा तो पैलवान आहे. बाला रफिकच्या घरात गेल्या 10 वर्षांपासून कुस्तीची परंपरा चालत आलेली आहे. त्याचे वडीलही पैलवान होते. त्यामुळे त्याला लहानपणीपासूनच घरातून कुस्तीचे धडे मिळायला सुरुवात झाली.
न्यू मोतीबाग तालमित बाला रफिकला हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांच्या छायेत शिकायला मिळाले. आंदळकरांनी त्याच्यावर कुस्तीचे संस्कार केले, त्याला कुस्तीचे डावपेच शिकवले. बाला रफिक हा आंदळकर यांचा शेवटचा शिष्य होता आणि याचं त्यांच्या शेवटच्या शिष्याने महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.
बाला रफिकने डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटलांकडूनही कुस्तीचे धडे घेतले आहेत. बाला रफिक याचे वजन 120 किलो, तर उंची 6 फूट आहे.
बाला रफिकच्या घरची परिस्थिती बिकट. दोन वेळचा पैलवानाला लागणारा हवा तसा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता. तरीही आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे सिद्ध करुन दाखवले की, परिस्थिती कशीही असेल, तरीही जर आपण ठरवलं तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
बाला रफिक सध्या पुण्याच्या हनुमान कुस्ती केंद्रात सराव करतो.