लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. जो संघ भारतीय संघाला हरवेल, तो संघ वर्ल्डकप जिंकेल, असं वॉनने म्हटलं आहे. वॉनने ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
विश्वचषकात 30 जून रोजी टीम इंडियाचा सामना यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारताने या विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताने तब्बल 125 धावांनी विजय मिळवला.
भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना हरवून गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. भारताच्या खात्यात 11 गुण आहेत.
भारताच्या या फॉर्ममुळे मायकल वॉनने ट्विट करत, जो संघ भारताला हरवेल, तो वर्ल्डकप जिंकेल असं म्हटलं आहे.
Will stick to it … Whoever beats India will WIN the World Cup … !!! #CWC19
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 27, 2019
दरम्यान, भारताने सलग 5 विजय मिळवले असले, तरी अलिकडच्या दोन सामन्यांमध्ये भारताची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळल्याचं पाहायला मिळालं. अफगाणिस्तानविरुद्ध भारताची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. शिवाय वेस्ट इंडिजविरुद्धही भारतीय फलंदाज विशेष कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना करुन दाखवावं लागेल, अन्यथा इंग्लंडमधील भारताचं आव्हान कठीण होऊ शकतं.