मुंबई : ‘कॅप्टन कूल’ अशी बिरुदावली अभिमानाने मिरवणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि जगभरातील चाहते हळहळले. धोनीने मैदानावर निवृत्ती न घेतल्याने कुटुंबीय आणि निकटवर्तीय यांनाही चुटपूट लागून राहिली आहे. माहीची पत्नी साक्षी धोनीही काहीशी भावूक झाल्याचे दिसत आहे. (Wife Sakshi Dhoni reacts on MS Dhoni Retirement Decision)
साक्षी धोनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तू जे साध्य केलंस, त्याचा अभिमान बाळगला पाहिजेस. खेळात तुझे सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल अभिनंदन. मला तुझ्या कर्तृत्वाचा आणि तू व्यक्ती म्हणून जो आहेस, त्याचा अभिमान आहे! मला खात्री आहे की तुझ्या पॅशनला निरोप देताना तुलाही अश्रू रोखावे लागले असतील. तुला आरोग्य, आनंद आणि भविष्यात उत्तम वाटचालीसाठी शुभेच्छा!” असे साक्षीने लिहिले आहे.
“आपण काय बोललो, हे लोक विसरतील; आपण काय केले, हेही ते विसरतील, परंतु आपण त्यांना काय जाणवून दिले, हे ते कधीच विसरणार नाहीत” या अमेरिकन लेखिका माया अँजेलो यांच्या ओळीही साक्षीने शेअर केल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले. त्याशिवाय या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ,’ हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. “तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे… 1929 (म्हणजे संध्याकाळी 7.29) पासून मला निवृत्त समजावे,” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.
संबंधित बातम्या :
युवराजचा बोलर म्हणून वापर, ते सलामीसाठी रोहितची निवड, धोनीचे 10 बेमिसाल निर्णय
वय वाढलं, पण फिटनेसबद्दल बोलण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती, धोनीच्या निवृत्तीची कारणे कोणती?
मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा
(Wife Sakshi Dhoni reacts on MS Dhoni Retirement Decision)