लंडन: भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. मात्र, रोहित शर्मासह जगातील कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडता आला नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन मॅन ऑफ द सीरिज अर्थात मालिकावीर ठरला, मात्र त्यालाही सचिनचा विक्रम मोडता आला नाही.
रोहितने विश्वचषकात 81 च्या सरासरीने सर्वाधिक 648 धावा केल्या. मात्र, सेमीफायनलमधील त्याच्या अपयशी खेळीने तो सचिनचा एकाच विश्वचषकातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात हुकला. सचिनने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या विश्वचषकात 673 धावांची तुफान खेळी केली होती.
रोहितची सचिनच्या एका विक्रमाशी बरोबरी
रोहितने या विश्वचषकात 5 दमदार शतकं ठोकली. त्याच्या आतापर्यंतच्या विश्वचषकातील एकूण शतकांची संख्या 6 झाली. यासह त्याने विश्वचषकात सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विश्वचषकात रोहितचा सर्वोच्च स्कोर 140 होता.
डेव्हिड वार्नरही विक्रम मोडण्यात अपयशी
रोहितनंतर सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वार्नरला होती. मात्र, इंग्लंडने सेमीफायनल सामन्यात केलेल्या पराभवामुळे वार्नरचीही संधी हुकली. वार्नरने या विश्वचषकात 10 सामन्यांमध्ये 71.88 च्या सरासरीने 647 धावा केल्या. वार्नर सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. वार्नरने 3 शतकं आणि 3 अर्धशतकं केली.
बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 8 सामन्यांमध्ये 86.57 च्या सरासरीने एकूण 606 धावा केल्या. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी राहिला. या तिघांव्यतिरिक्त आणखी कोणताही फलंदाज या विश्वचषकात 600 धावांचा टप्पा पार करु शकला नाही.
‘फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघातील खेळाडूंकडे संधी’
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड संघातील प्रत्येकी एका खेळाडूला रोहितला मागे टाकत सचिनचा विश्वविक्रम मोडण्याची संधी होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 126 धावांची आवश्यकता होती, मात्र तो अंतिम सामन्यात केवळ 30 धावाच करु शकला. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विल्यमसन चौथ्या क्रमांकावर राहिला. विल्यमसनने 10 सामन्यात 82.57 च्या सरासरीने 578 धावा केल्या. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 5 अधर्शतकांचा समावेश आहे. त्याला मॅन ऑफ द सीरिज घोषित करण्यात आले.
इंग्लंडच्या ज्यो रुटला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 125 धावांची गरज होती. मात्र, रुटला अंतिम सामन्यात केवळ 7 धावा करता आल्या. तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत 5 व्या स्थानी राहिला. त्याने 11 सामन्यांमध्ये 61.77 च्या सरासरीने 556 धावा केल्या. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा आणि 2 शतकांचा समावेश आहे.