India vs Pakistan मँचेस्टर (इंग्लंड) : भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. त्यानंतर आता भारत पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सज्ज आहे.
दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला.
सचिनचा सल्ला
भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने विराट कोहलीच्या टीम इंडियाला सल्ला दिला आहे. “पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर हा भारतासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे त्याच्यापासून सतर्क राहा, मात्र त्याच्या गोलंदाजीला आक्रमकपणे सामोरं जा”, असा सल्ला सचिनने कोहलीला दिला. मोहम्मद आमीरने सध्या विश्वचषकात सर्वाधिक 10 विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर केवळ 30 धावा देत आमीरने 5 विकेट्स घेतल्या होत्या.
सचिन म्हणाला, “रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन भारताचे अनुभवी खेळाडू आहेत. पाकिस्तानी गोलंदाजांचं लक्ष्य हे दोघेच असतील. त्यांना तातडीने बाद करण्याचा प्रयत्न आमीर आणि वहाब रियाज करतील. मात्र रोहित-विराटने मोठी इनिंग खेळण्यावर लक्ष द्यावं”.
What a spell from Mohammad Amir! #CWC19 pic.twitter.com/6WvFnQQrTp
— CricTracker (@Cricketracker) June 12, 2019
विश्वचषकाचा इतिहास
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये विश्वचषकात आतापर्यंत 6 वेळा सामने रंगले. भलेही पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात भारताला अनेकवेळा हरवलं असलं, तरी भारताने विश्वचषकात नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये 131 आंतरराष्ट्रीय वन डे सामने झाले. यापैकी 73 सामने पाकिस्तानने तर 54 सामने भारताने जिंकले, 4 सामने अनिर्णित राहिले. मात्र विश्वचषकातील 6 पैकी 6 सामन्यात भारताने विजय मिळवला.
या विश्वचषकात भारताचे आतापर्यंत तीन सामने झाले आहेत, ज्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला, तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघ 5 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानने चार सामने खेळले असून दोन पराभवांचा सामना करावा लागलाय. पाकिस्तानचाही एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे पाकिस्तान 3 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.
तिकिटांच्या किमती गगनाला
विश्वचषकातील मच अवेटेड भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एका तिकिटाची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. 2013 नंतर भारत आणि पाकिस्तान यांचा सामना फक्त आयसीसी आणि आशिया क्रिकेटच्या मालिकांमध्येच होतो. ब्रिटेनमध्ये लाखोंच्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात. त्यामुळे या महामुकाबल्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. 20 हजार क्षमता असलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाची खिडकी उघडताच सर्व तिकिटांची विक्री झाली. पण ज्यांनी तिकिटं घेतली आहेत, ते लोक यातून मोठा नफा कमावत आहेत.
संबंधित बातम्या
जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!
हॉटेलमध्ये सुविधा नाही, प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट, भारतीय संघाची मजबुरी
भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल 60 हजारांच्याही पुढे
World Cup : पावसामुळे क्रिकेट मॅच रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का?
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सराव, धोनी पाकिस्तानसाठी रणनीती आखत होता