मुंबई: भारतातील क्रिक्रेट चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आला आहे. आज भारताचा क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना होत आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाईल. अनेक दिग्गज भारतीय संघाला यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानतात. मात्र, आज होणाऱ्या या सामन्याची आकडेवारी मात्र भारताच्या बाजूची नाही.
रेकॉर्ड्स दक्षिण आफ्रिकेसोबत, मात्र परिस्थिती भारतासोबत
मागील काही सामन्यात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका संघावर दबदबा राहिला आहे. मात्र, विश्वचषकातील सामन्याचा विचार केला असता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघावर नेहमीच वरचढ असल्याचे पाहायला मिळाले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये 1992 पासून आत्तापर्यंत विश्वचषकासाठी 4 सामने खेळले गेले आहेत. या 4 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने तब्बल 3 सामन्यांमध्ये, तर भारताने केवळ 1 सामन्यात विजय मिळवला आहे.
विश्वचषक 1992
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिला विश्वचषक सामना 1992 मध्ये ऑस्ट्रेलियातील एडलेड ओव्हलमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला 6 विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. याच वर्षी पाकिस्तानने इमरान खानच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
विश्वचषक 1999
यानंतर पुन्हा 1999 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरा विश्वचषक सामना झाला. त्यावेळीही भारताला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेकडून 4 विकेटने पराभवाचे तोंड पाहावे लागले. या सामन्यात सौरव गांगुलीने 97 धावांची शानदार खेळी होती, मात्र ही खेळी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून देऊ शकली नाही.
विश्वचषक 2011
हे दोन्ही संघ 2011 विश्वचषकात पुन्हा समोरासमोर आले. यावेळीही निकाल तोच लागला. या सामन्यातही भारताला 3 विकेटने पराभव स्वीकारावा लागला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकात खेळताना पराभवाची हॅट्रिक केली.
विश्वचषक 2015
पराभवाच्या हॅट्रिकनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील विश्वचषकात 2015 ला पुन्हा एकमेकांसमोर होते. मात्र, यावेळी निकाल काही वेगळाच होता. भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा मेलबर्नच्या मैदानावर 130 धावांनी दारुण पराभव केला आणि आपल्या पराभवाचा वचपा काढला.
विश्वचषक 2019
2019 विश्वचषकातही हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषकातील हा तिसरा सामना असेल आणि भारताचा पहिला सामना असेल. दक्षिण आफ्रिकेला याआधीच्या आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. जर भारतासोबतच्या आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, तर एकाच विश्वचषकात सलग 3 सामने हरण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा हा नवा रेकॉर्ड होईल. विश्वचषक सामने सुरु झाल्यापासून आफ्रिकेचा संघ आजपर्यंत कधीही सलग 3 सामने हरलेला नाही. मात्र, यावेळी हा रेकॉर्ड तुटून नवा रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी भारताचा संघही तेवढाच ताकदीचा आहे.