नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मोहम्मद शमी याची कमाल उभ्या देशाने पाहिली. हा सामना भारतीय कधीच विसरणार नाहीत. क्रिकेट जगतात त्याच्या गोलंदाजीची चर्चा होणारच. त्याच्या गोलंदाजीमुळे या सामन्यावर भारताची पकड कशी मजबूत होत गेली, हे चाहत्यांनी याची देहि याची डोळा पाहिले आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सरस कामगिरी बजावली. भारत हा यंदाच्या विश्वचषकाचा मजबूत दावेदार मानल्या जातो, तो अशा गुणी खेळाडूमुळेच. त्याच्या कामगिरीच्या प्रेमात तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पण पडले आहेत. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता.
खेड्यातून आजमावले नशीब
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका खेड्यातून मोहम्मद शमीने इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे. या विश्वचषकात त्याने आतापर्यंत 23 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या जडणघडणीत त्याचे कोच बदरुद्दीन यांची भूमिका सर्वात महत्वाची ठरली. मोहम्मद शमी 13,14 वर्षांचा असताना त्याने 25 किलोमीटर दूर असलेल्या मुरादाबादच्या सोनकपूर स्टेडियममध्ये गुरुमंत्र घेतला. त्याचे कोच बदरुद्दीन यांनी त्याला घडविण्यात मोलाची भूमिका निभावली.
अशी झाली पारख
मोहम्मद शमीचे वडील त्याला सोनकपूर स्टेडियममध्ये घेऊन आले होते. 2002 मधील हा किस्सा आहे. त्यावेळी कोच बदरुद्दीन यांना त्यांनी मुलाचे कौतुक सांगितले. बदरुद्दीन यांनी शमी याला वार्मअम करायला लावला. त्यानंतर त्याला 30 मिनिटे गोलंदाजी करायला लावली. पहिल्या मिनिटाला टाकलेला चेंडू आणि 30 मिनिटाला टाकलेला चेंडू यामध्ये कोणतेच अंतर नसल्याचे कोचच्या लक्षात आले.
जून महिन्यात अत्यंत उकाडा असताना पण शमी जोरदार गोलंदाजी करत असे. न थकता त्याची मेहनत सुरु असायची. तो आजारी पडू नये, यासाठी गोलंदाजी करताना त्याला थांबवावे लागायचे, अशी आठवण बदरुद्दीन यांनी सांगितली. त्याच्या अनेक आठवणी कोचने जागवल्या.
खासगी आयुष्यातील वादळावर केली मात
शमीने त्याच्या मनगटाचा चांगला उपयोग केल्याचे त्याचे कोच आवर्जून उल्लेख करतात. ज्याला या मनगटाचे कौशल्य कळाले, त्याला विकेट घेणे सर्वात सोपे असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही जितक्या खुबीने मनगटाचा वापर कराल, तितके चांगले गोलंदाज व्हाल असा मंत्र त्यांनी दिला. शमीने आता त्याच्या खासगी आयुष्यातील वादळावर मात केल्याचे ही बदरुद्दीन यांनी सांगितले.