मुंबई- पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा एक डाव 132 धावांनी दारुण पराभव केला. बॉर्डर गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेवर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित अवलंबून आहे. आयसीसीच्या गुणतालिकेनुसार भारताला ही मालिका 3-0 नं जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे भारताची या मालिकेत कसोटी लागणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकत भारतानं आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसरं स्थान निश्चित ठेवलं आहे. भारताचा दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीला दिल्लीला असणार आहे. असं असलं तरी अंतिम फेरीच्या शर्यतीत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघही आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित आहे. म्हणजेच अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन संघांची चुरस असणार आहे.
ऑस्ट्रेलिया 70.83 गुणांसह अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या मालिकेत कोणताही फरक पडणार नाही. मालिका पराभूत झाल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या स्थानी येऊ शकते. भारत 61.67 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 नं जिंकायची आहे. तिसऱ्या स्थानी 53.33 गुणांसह श्रीलंका आहे. तर चौथ्या स्थानी 48.72 गुणांसह दक्षिण आफ्रिका आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमवल्यास श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर गणित अवलंबून असणार आहे.
फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.
आयसीसीला यंदाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅचचं आयोजन लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडमध्ये करण्यात अपयश आलं आहे. दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे.