WPL 2023: स्मृती मंधाना आणि विराट कोहली यांच्यात असं काय घडलं? दोघंही सोशल मीडियावर ट्रोल

| Updated on: Mar 07, 2023 | 12:42 PM

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग दुसरा पराभव झाला आहे. या पराभवानंतर स्मृती मंधाना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. इतकं काय तर तिची तुलना आता विराट कोहलीसोबत होत आहे.

WPL 2023: स्मृती मंधाना आणि विराट कोहली यांच्यात असं काय घडलं? दोघंही सोशल मीडियावर ट्रोल
स्मृती मंधानाचं विराट कोहलीच्या पावलावर पाऊल, दोघंही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Image Credit source: Smriti Mandhana Facebook
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेची रंगत आता वाढत चालली आहे. स्पर्धा जस जशी पुढे जात आहे, तसा एखाद्या संघाचं वर्चस्व दिसत आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स या संघानी विजयाची मोहोर उमटवली आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायन्ट्स पहिल्या विजयासाठी आतुर आहेत. या दोन्ही संघांनी स्पर्धेतील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधाना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. इतकंच काय तर तिची तुलना आयपीएलमध्ये अपयशी ठरलेल्या विराट कोहलीशी केली जात आहे.

आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीकडे काही काळासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कर्णधारपद होतं. मात्र एकही जेतेपद पटकावता आलं नाही. त्यात खेळावर परिणाम होत असल्याने त्याने कर्णधारपद सोडलं. दुसरीकडे, डब्ल्यूपीएलमध्ये स्मृती मंधानाकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कर्णधारपद आहे. त्यात संघाची सुरुवात पराभवाने झाल्याने नेटकरी ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर मीम्स शेअर करत टीका करत आहेत.

 

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील संघाला 60 धावांनी पराभव सहन करावा लागला. या सामन्यात स्मृतीने 23 चेंडूत 35 धावांची खेळी केली. या खेळीत 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 9 विकेट्स पराभव सहन करावा लागला. बंगळुरुने दिलेलं 156 धावांचं आव्हान मुंबईने 14.2 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात स्मृतीने 17 चेंडूत 23 धावांची खेळी केली होती. या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पुढचा सामना गुजरात जायन्ट्ससोबत आहे. 8 मार्च 2023 रोजी हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. आता या सामन्यात कोण बाजी मारत याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

  • 8 मार्च GG vs RCB, संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 10 मार्च RCB vs UPW संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 13 मार्च DC vs RCB संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम
  • 15 मार्च UPW vs RCB  संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडिय
  • 18 मार्च RCB vs GG संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 21 मार्च RCB vs MI दुपारी 3:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम

आरसीबी टीम | स्मृति मंधाना (कर्णधार), दिशा कसट, ऋचा घोष, इंदिरा रॉय, एलिस पेरी, सोफी डिवाइन, हेदर नाइट, एरिन बर्न्स, डाने वेन निकर्क, श्रेयंका पाटील, पूनम खेमनर, आशा शोबाना, कनिका अहूजा, रेणुका सिंह ठाकूर, प्रीति बोस, कोमल जैनजद, सहाना पवार आणि मेगन सुचित.