मुंबई – आयपीएल 2022 च्या 20 व्या सामन्यात, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा तीन धावांनी पराभव केला. राजस्थानसाठी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा या सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. चहलने या सामन्यात चार षटकांत 41 धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. या कामगिरीनंतर चहलकडे आता पर्पल कॅप (Purple Cap) आहे. चहलने कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादवकडून पर्पल कॅप हिसकावून घेतली आहे.
चहलने या मोसमात 4 सामन्यांतून 11 विकेट घेतल्या असून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. उमेशने पाच सामन्यांत 10 बळी घेतले असून तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. उमेशने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चार षटकांत 48 धावा देत विकेट घेतली. त्याचबरोबर या सामन्यात चार षटकात 35 धावा देऊन चार विकेट घेणारा दिल्ली कॅपिटल्सचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आता मोसमातील आघाडीच्या बळींच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीप यादवच्या नावावर आता चार सामन्यांत 10 बळी आहेत.
या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत सध्या भारतीय गोलंदाजांचा दबदबा आहे. यामध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल टॉप तीनमध्ये सामील झाले आहेत. बंगळुरूचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने मुंबई इंडियन्सविरुद्ध चार षटकांत 28 धावांत दोन बळी घेतले. आयपीएल पर्पल कॅप 2022 च्या शर्यतीत हसरंगा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा आवेश खान पाच सामन्यांत आठ विकेट्स घेऊन पाचव्या क्रमांकावर आहे.