मुंबई : टीम इंडियाचा (Team India) आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने (Yusuf Pathan) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. युसूफने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यूसूफने त्याच्या कुटुंबियांचे, टीम इंडियातील सहकाऱ्यांचे, संघ व्यवस्थापनाचे, सर्व चाहत्यांच्याचे आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. (Yusuf Pathan Announces Retirement From All Forms Of Cricket)
I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirement pic.twitter.com/usOzxer9CE
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) February 26, 2021
निवृत्तीची घोषणा करताना युसुफ म्हणाला की, “भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणं आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन जाणं हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण होते. मी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात डेब्यू केलं. तसेच आयपीएलमध्ये कोलकातासाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा विजेतपद पटकावलं, यासाठी गौतम गंभीरचा मी आभारी आहे”, असं युसूफने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
टीम इंडियाने 2007 मध्ये पाकिस्तानला पराभूत करत पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावलं होतं. तर तसेच 2011 मध्ये श्रीलंकेवर मात करत तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युसूफ टीम इंडियाचा भाग होता. युसूफने या अविस्मरणीय क्षणाचे दोन फोटो ट्विटमध्ये जोडले आहेत. यात त्याने सचिनला मिठी मारल्याचा फोटो आणि आपला भाऊ इरफान पठाणसोबतचा छायाचित्र शेअर केलं आहे.
युसूफने टी 20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं. युसूफने टी 20 मध्ये एकूण 22 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 146.58 स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या. तसेच 13 विकेट्सही मिळवल्या.
तसेच एकूण 57 वनडेमध्ये त्याने 2 शतक आणि 3 अर्धशतकांसह 810 धावा केल्या. 123 ही त्याची वनडेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. सोबतच त्याने 33 बळीही घेतल्या.
संबंधित बातम्या :
टीम इंडियाच्या आर विनय कुमारचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, ट्विटरवरुन दिली माहिती
(Yusuf Pathan Announces Retirement From All Forms Of Cricket)