Yuvraj Singh retired मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युवराज सिंहने क्रिकेटला अलविदा केला. निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी युवीच्या आयुष्यावरील माहितीपट दाखवण्यात आला. जसजसा माहितीपट पुढे सरकत होता, तस-तसा युवराज सिंहचे डोळे डबडबत होते. अखेर निवृत्ती घोषित करण्याचा क्षण आला आणि युवराज सिंहचे अश्रू ओसंडून वाहू लागले. कॅन्सरसारख्या आजाराला गाडून खंबीरपणे उभा राहिलेला युवराज सिंह आज प्रचंड हळवा झाला होता.
“मला सगळ्यांनीच सहकार्य केलं. नितेश रोहतगी डॉक्टरांनी केलेल्या उपचारांसाठी आभारी आहे. कॅन्सर रुग्णांना मी आता मदत करतोय आणि मला त्याचा आनंद आहे”, असं युवराज सिंह म्हणाला.
लाहोरची पहिली मॅच, 2011 वर्ल्ड कप, इंग्लंडविरुद्ध 6 सिक्स मारलेली मॅच अशा अनेक चांगल्या आठवणी आहेत, असं युवीने सांगितलं.
संधी मिळत नव्हती आणि यश येत नव्हतं म्हणून निवृत्तीच्या विचारात होतो. आयुष्यात सगळं मिळत नाही. गेल्या आयपीएलमध्ये थांबण्याचा विचार आला होता. आता थांबतोय, असं युवराज म्हणाला.
कपिल देव यांनी वर्ल्ड कप उचलला तेव्हा वडील नाराज होते की त्यांना तो उचलता आला नव्हता. पण त्यांचं स्वप्न 28 वर्षांनी माझ्याकडून पूर्ण झाल्याने ते खुश होते आणि आताही ते खुश आहेत.
मी निवृत्ती संदर्भात माझ्या टीम बॅचच्या मित्रांना सांगितलं होतं, चर्चा केली होती. मला बीसीसीआयने कुठलीच शेवटची मॅच खेळण्याबाबत विचारणा केली, ना मी बीसीसीआयकडे त्याबाबत विचारणा केली, अशी खंतही युवराजने बोलून दाखवली.
युवराजची कारकीर्द
भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता.
युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.
शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.
LIVE : युवराज सिंह लाईव्ह https://t.co/X2XqK5MCEG
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2019
संबंधित बातम्या
Yuvraj Singh | ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहकडून निवृत्तीची घोषणा